कणकवली – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात चालू करण्यात आलेली ‘चांदा ते बांदा’ ही योजना बंद करून विद्यमान आघाडी सरकारने ‘सिंधुरत्न समृद्धी’ योजना आणली; मात्र गेल्या सव्वा वर्षाच्या काळात एक रुपयाही या योजनेखाली व्यय केला नाही. त्यामुळे ही नवीन योजना फसवी आहे. या योजनेचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभ होणार नाही, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी केली.
भाजपच्या येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात नुकत्याच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राजन तेली बोलत होते. तेली पुढे म्हणाले की, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेच्या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ७५ कोटी रुपयांचे सार्वजनिक हिताचे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात सरकारने सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी १९३ कोटी रुपयांचा निधी दिला होता.
त्यापैकी १०१ कोटी रुपये निधी खर्च झाला. अखर्चित ९८ कोटी रुपये निधी ठाकरे सरकारने मागे घेतला. शेतकरी, महिला बचतगट, युवक-युवती यांना रोजगार देऊन त्यांची आर्थिक उन्नती करणे हा ‘चांदा ते बांदा’ योजनेचा हेतू होता; मात्र ही योजना गुंडाळून आणलेल्या ‘सिंधुरत्न समृद्धी’ योजनेने जिल्ह्याच्या विकासाला खिळ घालण्याचे काम आघाडी सरकारने केले आहे.