बांगलादेशाच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी बांगलादेशाने प्रमुख अतिथी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले होते आणि पंतप्रधानांनी त्याचा स्वीकार करत या कार्यक्रमाला उपस्थितीही लावली. बांगलादेशाची स्थापना ही भारतामुळेच झाल्याने बांगलादेशाने या कार्यक्रमासाठी भारताच्या पंतप्रधानांना बोलावणे अपेक्षितच होते. तसेच बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी भारताचे सध्या चांगले संबंध आहेत. शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशाचे पहिले पंतप्रधान शेख मुजीबूर रहमान यांना अन् त्यांच्या कुटुंबियांना वर्ष १९७१ च्या युद्धाच्या वेळी पाकच्या सैन्याच्या तावडीतून भारतीय सैन्यानेच वाचवले होते. यामुळे हे संबंध तेव्हापासून दृढ आहेत. नंतर मुजीबूर रहमान यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची तेथील सैन्याने त्यांच्या भवनावर रणगाड्यातून तोफ डागून हत्या केली. या वेळी शेख हसीना आणि त्यांची बहीण शेख रेहाना जर्मनीमध्ये गेल्याने वाचल्या. मुजीबूर रहमान यांचे इंदिरा गांधी यांच्याशी चांगले संबंध होते; मात्र सैन्याने सत्ता पालट केल्यावर तेथे धर्मांधांच्या सरकारचे वर्चस्व निर्माण झाले. पुढच्या काळात शेख हसीना यांनी त्यांचा पक्ष जिवंत ठेवून सत्ता मिळवली आणि पुन्हा भारताशी चांगले संबंध निर्माण केले. यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांची सत्ता उलथवणार्या धर्मांधांना आणि सैन्याधिकार्यांना पकडून त्यांच्यावर खटले चालवून अनेकांना फाशीची शिक्षाही दिली. तरीही बांगलादेशामध्ये धर्मांधांचा मोठा प्रभाव आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि बांगलादेशाची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंत तेथील हिंदूंवर धर्मांधांकडून अत्याचार होतच आहेत. ते थांबलेले नाहीत. शेख हसीना यांच्याशी कितीही चांगले संबंध असले, तरी भारत सरकारही या हिंदूंच्या रक्षणासाठी काही करू शकलेले नाही, ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशाच्या दौर्यावर गेल्यावर तेथील ५१ शक्तीपिठांपैकी एक असणार्या जेशोरेश्वरी कालीमातेच्या मंदिरात जाऊन पूजा केली. तसेच अन्यही मंदिरात जाऊन पूजा केली. हे तेथील धर्मांधांना रूचलेले नाही. मुसलमानबहुल देशात येऊन तेथील मंदिरात जाऊन पूजा करण्याचे धाडस पंतप्रधान मोदी यांनी दाखवले, तर त्याचा सूड घेतलाच पाहिजे, याच भावनेतून मोदी भारतात परत गेल्यावर लगेचच धर्मांधांनी हिंदूंवर आणि त्यांच्या मंदिरांवर आक्रमणे केली. बांगलादेश, पाकिस्तान येथे मंदिरांवर आक्रमणे होतच असतात. बांगलादेशात झालेले आताचे आक्रमण हे केवळ मोदी यांना डिवचण्यासाठीच केले गेले आहे, असेच म्हणावे लागले. ‘आम्ही तुमच्या धर्मावर आघात करू शकतो, येथे आमची सत्ता आहे’, असेच त्यातून दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. मोदी यांनी मंदिरांत जाण्यामागील उद्देशही कदाचित् हा असू शकतो की, हिंदूंच्या दृष्टीने मंदिरांचे महत्त्व पुष्कळ मोठे आहे. त्याला भारताचे पंतप्रधानही त्याच दृष्टीने पहातात. मंदिरांच्या संदर्भात कुणी वाईट केले, तर भारत ते सहन करणार नाही. मोदी यांच्या बांगलादेश दौर्यालाच तेथील जिहादी संघटना विरोध करत होते. त्यांनी याविरोधात केलेल्या हिंसाचारात १० जण ठारही झाले आहेत. अजून पुढे किती दिवस धर्मांध मोदी यांच्या मंदिरातील दर्शनाचा राग काढतील, हे सांगता येणार नाही. नाहीतरी धर्मांधांना हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी कोणतेही निमित्त चालते. त्यात मोदी यांच्या मंदिर दर्शनाचे निमित्त घेऊन त्यांना अधिकच चेव येण्याची शक्यता आहे. यावर शेख हसीना कशा नियंत्रण मिळवून हिंदूंचे रक्षण करतात, हेच पाहिले पाहिजे. आतापर्यंत तरी त्यांनी हिंदूंचे विशेष रक्षण केले आहे, असेतरी दिसून आलेले नाही.
भारतातही हिंदू असुरक्षित !
पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ष २००२ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असतांना गोध्रा येथे धर्मांधांनी कारसेवक असणार्या साबरमती एक्सप्रेसला आग लावली. त्यात ५९ कारसेवक ठार झाले. यानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली. यात धर्मांधांना धडा शिकवण्यात आला. त्यानंतर पुढील १९ वर्षांत धर्मांधांना पुन्हा हिंदूंवर आक्रमण करण्याचे धाडस झालेले नाही. भारतात यापूर्वी असे कधीही झाले नव्हते, ते गुजरातमध्ये झाले. त्यापूर्वी आणि त्यानंतर गुजरात वगळता अन्य राज्यांमध्ये हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होत आहेत; मात्र त्यांचा योग्य बंदोबस्त झालेला नाही. केंद्रात आणि अनेक राज्यांत भाजपचे सरकार असतांना तेही अशा घटना कायमस्वरूपी रोखू शकलेले नाहीत. त्यामुळे बांगलादेशातीलच नव्हे, तर जगातील, विशेषतः इस्लामी देशांतील हिंदूंवरील आक्रमणे रोखणे अवघडच आहे. त्यात ‘बांगलादेशातील धर्मांधांनी मंदिरांवर आक्रमण करून आता मोदी यांनाच एक प्रकारे आव्हान दिले आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. मोदी यांनी आखाती देशांशी चांगले संबंध निर्माण केल्यामुळे काही प्रमाणात तरी तेथे नोकरीनिमित्त गेलेल्या हिंदूंना चांगली वागणूक मिळत आहे. अबूधाबी येथे हिंदूंचे भव्य मंदिर बांधण्यात येत आहे. असे कधी घडले नव्हते; मात्र अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे असे घडणे अशक्यच म्हणावे लागेल. ‘मोदी यांच्यात क्षमता असल्याने ते हे आव्हान अलीकडच्या काळात पेलवून दाखवतील’, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ठरणार नाही. बांगलादेशातील धर्मांधांनी किंवा त्यांच्या सैन्याने उठाव करून शेख हसीना यांचा काटा काढला, तर तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी असलेली एक आशाही नष्ट होऊ शकते. हे पहाता भारताने तेथील हिदूंच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत, असे वाटते.
भारताला आक्रमक व्हावेच लागेल !
भारतासह जगभरातील हिंदूंचे आणि त्यांच्या मंदिरांचे रक्षण होण्यासाठी भारताला आक्रमक व्हावे लागणार आहे. जगात कुठेही ज्यू व्यक्तीवर आक्रमण झाले, अत्याचार झाले, तर इस्रायल त्याचा वचपा काढतो. तसेच धोरण भारताचे असले पाहिजे. त्यासाठी सरकारी पातळीवर तसे धोरण ठरवावे लागणार. आताच्या स्थितीत भारतातील हिंदूंचेही रक्षण होत नाही, तेथे अन्य देशांतील आणि विशेषतः इस्लामी देशांतील हिंदूंचे रक्षण कसे होणार ? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी धर्मांधांविषयी सांगितले आहे, ‘ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्य असतात, तेथे त्यांना धर्मांधांकडून मार खावा लागतो. अशा वेळी त्यांचे रक्षण करण्यासाठी जेथे हिंदू बहुसंख्य आहेत आणि धर्मांध अल्पसंख्य आहेत, तेथे हिंदूंनी वचक निर्माण केला, तर अल्पसंख्य हिंदू जेथे आहेत, तेथे त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही.’ स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत भारताने ही सावरकर नीती न अवलंबल्यामुळे हिंदूंना सर्वत्र मार खावा लागत आहे. ही स्थिती पहाता भारताने सावरकर नीती अवलंबण्याची हीच योग्य वेळ आहे !