मंत्री सुरेश राणा, आमदार संगीत सोम, साध्वी प्राची यांच्यासमवेत १२ नेत्यांच्या विरोधातील खटला मागे घेण्यास न्यायालयाची अनुमती !

वर्ष २०१३ च्या मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) दंगलीचे प्रकरण

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथे वर्ष २०१३ मध्ये झालेल्या दंगलीच्या प्रकरणी भाजप सरकारमधील मंत्री सुरेश राणा, आमदार संगीत सोम, माजी खासदार भारतेंदू सिंह, विहिंपच्या नेत्या साध्वी प्राची यांच्यासमवेत १२ नेत्यांवरील गुन्हे मागे घेण्याची अनुमती स्थानिक न्यायालयाने दिली आहे.

या नेत्यांनी एका महापंचायतमध्ये भाग घेतला होता आणि त्यानंतर ऑगस्ट २०१३ मध्ये कथित चिथावणीखोर भाषण दिले होते. त्यानंतर येथे धार्मिक दंगल भडकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. येथील कवाल गावामध्ये दोघा हिंदु तरुणांची धर्मांधांकडून हत्या करण्यात आल्यावर ही दंगल झाली. यात ६२ लोकांचा मृत्यू झाला, तर ५० सहस्रांहून अधिक जण विस्थापित झाले होते.