गंगास्नानाने सर्व विषाणू नष्ट होतात ! – सत्पाल महाराज, पर्यटन, सांस्कृतिक आणि पाटबंधारे मंत्री

सत्पाल महाराज, पर्यटन, सांस्कृतिक आणि पाटबंधारे मंत्री

हरिद्वार, १९ मार्च (वार्ता.)  – गंगास्नानाने सर्व विषाणू नष्ट होतात आणि हे विज्ञानानेही सिद्ध झाले आहे. त्यामुळे कुंभमेळ्यातील देव डोलियांच्या (देवांच्या मूर्तींना पालखीत बसवण्याची उत्तराखंडाची ऐतिहासिक आणि प्राचीन परंपरा) गंगास्नानाने अमृताच्या थेंबांनी पूर्ण मानवजातीचे कल्याण होणार आहे, असे प्रतिपादन पर्यटन, सांस्कृतिक आणि पाटबंधारे मंत्री सत्पाल महाराज यांनी येथे केले. प्रेमनगर आश्रमामध्ये श्री बद्रीनाथ आणि श्री हनुमान यांच्या पवित्र धर्मध्वजाच्या स्थापनेच्या प्रसंगी ते बोलत होते.

कुंभमेळ्यामध्ये २५ एप्रिल या दिवशी ‘देव डोलियां’चे स्नान होणार असल्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली. ‘देव डोलियां’चे स्नान ही उत्तराखंडाची ऐतिहासिक आणि प्राचीन परंपरा आहे. ‘या गंगा स्नानासाठी येणार्‍या देव डोलियांच्या कार्यक्रमाचा संपूर्ण व्यय सरकारद्वारे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे’, असे आश्‍वासन सत्पाल महाराज यांनी दिले. महामंडलेश्‍वर स्वामी श्री हरिचेतनानंद महाराज यांनी देवदेवतांच्या आशीर्वादाने येथील कुंभमेळा यशस्वी होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.