तळागाळातील भ्रष्टाचार संपण्यासाठी लाच घेणार्यांना त्वरित कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.
सातारा, १८ मार्च (वार्ता.) – अहवाल देण्यास सहकार्य करण्यासाठी तासगाव (जिल्हा सातारा) येथील मंडल अधिकारी संतोष शिवाजी झनकर यांनी तक्रारदाराकडे १० सहस्र रुपयांची लाच मागितली. ही लाच स्वीकारतांना झनकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
तक्रारदाराचा जिल्हा पुनर्वसन विभागाकडून मिळालेल्या भूमीविषयी खटला चालू आहे. ‘खटल्याच्या अनुषंगाने जमिनीविषयी झालेले आदेश पोकळ आहेत, असा अहवाल देण्यासाठी सहकार्य करतो’, असे तासगाव येथील मंडल अधिकारी संतोष झनकर यांनी तक्रारदाराला सांगितले. यासाठी २० सहस्र रुपयांची मागणी झनकर यांनी तक्रारदाराकडे केली. तडजोडीअंती १० सहस्र रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. विभागाने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचून झनकर यांना पकडले.