महाशिवरात्र

एक निर्दयी आणि महापापी व्याध होता. एके दिवशी तो मृगयेसाठी निघाला असतांना वाटेत त्याला शिवाचे देऊळ दिसले. तो महाशिवरात्रीचा दिवस असल्याने त्या ठिकाणी भक्त पूजा, भजन, कीर्तन करत असलेले त्याने पाहिले. ‘दगडाला देव मानणारे मूर्ख लोक ‘शिव शिव’ आणि ‘हर हर’ म्हणत आहेत’, अशी त्यांची चेष्टा करत तो वनात गेला. सावज पहाण्यासाठी तो एका झाडावर चढून बसला; पण पानांमुळे त्याला सावज दिसेना. तो एक एक पान तोडून फेकू लागला. त्या वेळी तो ‘शिव शिव’ असे म्हणत होता. ती पाने झाडाखाली असलेल्या शिवाच्या पिंडीवर त्याच्या नकळत पडत होती. पहाटे एक हरीण त्याला दिसले. व्याध त्याला बाण मारणार; एवढ्यात हरिणाने त्याला न मारण्याची प्रार्थना केली. पाप केल्याने काय होते तेही व्याधाला सांगितले आणि ते हरीण निघून गेले. न कळत झालेले महाशिवरात्रीचे जागरण, शिवाला झालेले बिल्वार्चन आणि शिवाचा जप यांमुळे व्याधाची पापे नष्ट होऊन त्याला ज्ञान प्राप्त झाले. या गोष्टीवरून नकळत घडलेल्या उपासनेनेही शिव प्रसन्न होतो, हे लक्षात येते.

यामपूजा : ‘शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात, असे विधान आहे. त्यांना ‘यामपूजा’ म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावे, अनुलेपन करावे, तसेच धोत्रा, आंबा आणि बेल यांची पत्री वहावी. तांदळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावे. पहाटे स्नान करून पुनश्‍च शिवपूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. आशीर्वाद घेऊन व्रतसमाप्ती करावी.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शिवाच्या उपासनेमागील शास्त्र’)