इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करणे, ही चूक होती’, अशी स्वीकृती काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे. काँग्रेसने जी अनेक पापे केली त्यांपैकी देशात आणीबाणी लागू करणे, हे मोठे पाप ! त्यामुळे त्याची स्वीकृती देणे, हे एकाअर्थी चांगले असले, तर ती देतांना राहुल गांधी यांनी भाजपवर केलेली टीका म्हणजे स्वतःचा गुन्हा झाकण्याचा निंदनीय प्रकार आहे. ‘स्वतःच्या आजीने म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्यामुळे जनतेवर अन्याय झाला’, या भावनेने राहुल गांधी यांनी चुकीची स्वीकृती दिलेली नाही, तर या सूत्रावरून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक वार करायचा आहे. ‘सध्या जे काही चालू आहे, ते आणीबाणीपेक्षाही वाईट आहे’, असे त्यांचे म्हणणे आहे. राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे; मात्र असे असले, तरी ऊठसूठ मोदी आणि सरकार यांच्यावर टीका करणे, यातून त्यांची राजकीय अपरिपक्वता दिसून येते. आणीबाणीचा काळ आणि आताचा काळ याची आपण तुलनाच करू शकत नाही. त्या काळात विरोधी पक्षांच्या शेकडो नेत्यांना अटक करण्यात आली. वृत्तपत्रांना आणीबाणीच्या विरोधात लिहिण्यास मनाई होती. भारतात आज अशी स्थिती आहे का ? राहुल गांधी यांना एक प्रकारे ‘इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करून चूक केली असली, तरी नरेंद्र मोदी हेही एकाधिकारशाहीने वागत आहेत’, असे सांगून आणीबाणीच्या पापाची दाहकता अल्प करायची आहे.
‘मोदी सत्तेत आल्यापासून भारतात असहिष्णुता वाढली आहे’, ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आली आहे’, अशा आवया उठवल्या जातात. खरे तर देशविघातक वक्तव्ये अथवा कृती करणार्यांवर कारवाई केली, तर त्यात चूक ते काय ? राष्ट्रहितासाठी अशी कठोर पावले उचलली, तर ती असहिष्णुता कशी ? इंदिरा गांधी यांनी त्यांचे विरोधक वरचढ होऊ नयेत, यासाठी आणीबाणी लागू केली. यात राष्ट्रहित नव्हे, तर त्यांचा स्वार्थ होता. सद्यःस्थिती पहाता देशात सत्ताधार्यांनी अनेक जनहितार्थ आणि देशहितार्थ निर्णय घेतले; मात्र या निर्णयांमुळे साम्यवादी, कथित सुधारणावादी आणि निधर्मीवादी यांना पोटशूळ उठला आहे. काँग्रेस सत्तेवर असतांना अशांना मानसन्मान होता, विविध सरकारी संस्थांमध्ये त्यांना सामावून घेतले जायचे. आताच्या सरकारने त्यांचे चोचले पुरवणे बंद केले असून त्यांनी केलेल्या देशविघातक कारवाया रोखण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. आता जनताही अशांना विविध सामाजिक माध्यमांद्वारे जाब विचारत आहे. त्यामुळे ही टोळी अस्वस्थ आहे. ही टोळी अस्वस्थ आहे; म्हणून राहुल गांधी यांच्यासारखी नेतेमंडळी अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांना देशात अघोषित आणीबाणी लागू केल्यासारखी वाटते. अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे समृद्ध लोकशाहीचे लक्षण समजले जाते; मात्र त्याचा अपलाभ देशविरोधी घटक उठवत असतील आणि त्यांच्यावर सरकार वचक निर्माण करू पहात असेल, तर त्याला ‘आणीबाणीसारखी स्थिती’ असे म्हणता येणार नाही. देशविघातक शक्तींवर कारवाई केल्यामुळे नव्हे, तर त्यांना मोकाट सोडल्यामुळे लोकशाही धोक्यात येते. त्यामुळे राहुल गांधी यांचा आणीबाणीचे सूत्र उगाळत बसून सरकारविरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. अशांना जनतेने पुरते ओळखले आहे.