इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावणे ही चूक होती ! – राहुल गांधी यांची स्वीकृती

‘सध्या जे काही चालू आहे, हे आणीबाणीपेक्षाही वाईट’ असे सांगत भाजपवर टीका

राहुल गांधी यांनी आणीबाणी चुकीची होती, असे सांगून थांबू नये, तर यासाठी काँग्रेस पक्षाने कठोर प्रायश्‍चित्त घेतले पाहिजे, तरच त्याला महत्त्व असेल !

नवी देहली – मला वाटते ती (आणीबाणी) एक चूक होती. नक्कीच ती चूक होती; मात्र आणीबाणीच्या काळात जे काही झाले आणि सध्या जे काही चालू आहे त्यात मूलभूत भेद आहे. काँग्रेस पक्षाने कधीही घटनात्मक चौकट स्वतःच्या कह्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही. तशी आपल्याला अनुमतीही नाही. आपली इच्छा असली, तरीही आपण ते करू शकत नाही, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. आणीबाणीच्या चुकीची स्वीकृती देत त्यांनी ‘सध्या जे काही चालू आहे, हे आणीबाणीपेक्षाही वाईट आहे’, असे सांगत भाजप सरकारवर टीका केली. प्रसिद्ध अर्थतज्ञ कौशिक बासू यांच्याशी चर्चा करतांना ते बोलत होते.

दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वर्ष १९७५ ते १९७७ या वर्षांतील २१ मास देशात आणीबाणी लावली होती. यापूर्वी वर्ष २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात राहुल गांधी यांनी एका मुलाखतीत ‘आणीबाणी चुकीची होती’, असे सांगत क्षमा मागितली होती. तसेच २४ जानेवारी १९७८ या दिवशी महाराष्ट्रातील एका सभेमध्ये इंदिरा गांधी यांनी जाहीरपणे याविषयी क्षमा मागितली होती.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, देशात स्वतंत्रपणे कार्य करणार्‍या संस्थांमध्ये संस्थात्मक समतोल राखला जात असल्यानेच आधुनिक लोकशाही कार्य करतात. भारतात त्या स्वातंत्र्यावरच आक्रमण केले जात आहे. रा.स्व. संघ नावाची एक मोठी संस्था इतर सर्व संस्थांमध्ये प्रवेश करत आहे. आक्रमण होत नाही, अशी एकही संस्था नाही आणि हे अत्यंत पद्धतशीरपणे चालू आहे. न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे, प्रशासकीय सेवा, निवडणूक आयोग आदी प्रत्येक संस्थेत अत्यंत पद्धतशीरपणे एक विशिष्ट विचारसरणी असणार्‍या आणि एका ठराविक संस्थेच्या लोकांनी भरली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

(काँग्रेसच्या काळात याच संस्थांमध्ये साम्यवादी, ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी, हिंदुद्वेषी, धर्मांध, जात्यंध यांचा भरणा करण्यात आला होता, असा आरोप नेहमीच केला जातो, त्याविषयी राहुल गांधी का बोलत नाहीत ? – संपादक)