१४१ गायी, म्हशी आणि रेडे यांची केली वाहतूक
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंशियांना उघडपणे हत्येसाठी नेले जाते, याचा अर्थ कायदा-सुव्यवस्था हा प्रकार राज्यात अस्तित्वात आहे का ? असाच प्रश्न पडतो ! केवळ कायदा असून उपयोग काय ? त्याची प्रभावी कार्यवाही कधी होणार ? या सर्वच प्रश्नांची उत्तरे शासनाने द्यायला हवीत !
गडचिरोली – येथे अल्प मूल्यामध्ये शेतकर्यांकडून गायी, म्हशी यांसह जनावरे खरेदी करून ती तेलंगाणाच्या पशूवधगृहात नेणार्या एका टोळीला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून १ कोटी १५ लाख ६८ सहस्र रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. गडचिरोलीच्या सीमेवरील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई समजली जाते.
आरमोरी तालुक्यात ठाणेगाव मार्गावर वाहनांची पडताळणी केल्यावर त्यातील ५ ट्रकमध्ये १४१ गायी, म्हशी आणि रेडे सापडले. या जनावरांचे मूल्य १७ लाख ५५ सहस्र रुपये आहे. आरोपींकडून १ लाख १३ सहस्र रुपयांचे १० भ्रमणभाष जप्त केले आहेत. जप्त केलेल्या वाहनांचे मूल्य ९७ लाख रुपये आहे. अटक केलेले बहुतांश आरोपी तेलंगाणातील, तर अन्य आरोपी नागपूर आणि मध्यप्रदेश येथील आहेत.