दंतवैद्यांच्या जागी परात्पर गुरु डॉ. आठवले असून ‘ते योग्य औषधोपचार सुचवून बरे करणार आहेत’, असा भाव ठेवल्यामुळे देवद आश्रमातील सौ. स्मिता नाणोसकर यांचे हिरडीचे दुखणे बरे झाल्याची त्यांना आलेली अनुभूती !
१. औषधोपचार करूनही हिरडी दुखण्याचे न थांबल्याने बाहेरील दंतवैद्यांना संपर्क करणे आणि ते औषधे सांगतांना ‘त्यांच्या जागी परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’,असा भाव ठेवणे
‘११.४.२०२० या दिवशी माझ्या हिरडीला सूज येऊन ती दुखत होती. आश्रमातील आधुनिक वैद्यांना दाखवले. तेव्हा त्यांनी मला औषध दिले. त्यानंतर तीन दिवस झाले, तरी मला काही त्याचा लाभ झाला नाही. १४.४.२०२० या दिवशी मी बाहेरील दंतवैद्य श्री. आशिष बांदेकर यांना ‘व्हॉट्सअॅप’ करून, मला होणारा त्रास सांगितला. त्यांना मी हिरडी सुजलेल्या भागाचे छायाचित्रही पाठवले. तेव्हा त्यांनी लगेचच मला कोणते औषध घ्यायचे ? काय काय करायचे (बर्फाने शेक घेणे इत्यादी) ?’, हे सर्व व्हॉट्सअॅपद्वारे सांगितले. ते मला म्हणाले, ‘‘जर सूज न्यून झाली नाही, तर ‘इमर्जन्सी अपॉइंटमेंट’मध्ये मी तुमचे नाव लिहून ठेवतो. तीन दिवसांनी मला काय ते कळवा.’’ त्या वेळी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना शरण जाऊन प्रार्थना केली. त्या वेळी त्या दंतवैद्यांच्या ठिकाणी ‘परात्पर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आहेत आणि ते मला योग्य औषधोपचार सुचवून बरे करणार आहेत’, असा भाव ठेवला अन् त्यांना संपूर्णपणे शरण जाऊन प्रार्थना केली, ‘हे गुरुमाऊली, माझे हिरडीचे दुखणे बरे होऊ दे. दंतवैद्यांनी सांगितलेली औषधे घेऊन मला बरे वाटू दे. दळणवळणबंदीच्या काळात मला बाहेर जावे लागू नये.’
२. दंतवैद्यांच्या औषधांनी बरे वाटणे आणि ती औषधेही सहज मिळाल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी कृतज्ञता वाटणे
खरोखरच तीन दिवसांत माझे दुखणे बरे झाले. दंतवैद्यांनी सुचवलेली औषधेही केवळ गुरुकृपेनेच मला सहज उपलब्ध झाली. त्यानंतर मी दंतवैद्यांना सर्व स्थिती सांगितली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आता तुम्ही दवाखान्यात येण्याची आवश्यकता नाही.’’
परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच केवळ भ्रमणभाषद्वारे मला दंतवैद्यांकडून योग्य औषधे समजली. अन्य वैद्यांना दूरभाष केला असता, तर कदाचित् त्यांनी मला प्रत्यक्ष येऊन भेटा’, असे सांगून मला दवाखान्यातच बोलावले असते. तेथे उपचार करण्यासाठी मला ५०० ते ६०० रुपये व्यय करावे लागले असते; परंतु परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे मला सर्व काही सहज उपलब्ध झाले.
त्यासाठी मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. ‘गुरुमाऊलींच्या कृपेमुळे अशक्य गोष्टही शक्य होऊ शकते’, याची मी अनुभूती घेतली.
‘हे गुरुमाऊली, हे सर्व आपणच माझ्याकडून लिहून घेतलेत, याविषयी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. स्मिता नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.४.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |