ह.भ.प. सखारामबुवा बांद्रे महाराज यांच्या वहीतील लिखाणाची निवड करतांना सौ. शालिनी मराठे यांना मिळालेली पूर्वसूचना

पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज

१. वहीतील लिखाणाची निवड करण्याची सेवा मिळाल्यावर मनात अनेक प्रश्‍न उद्भवणे; परंतु संतांनी सेवा दिल्याचे समजल्यावर मनातील सर्व प्रश्‍नांचे बुडबुडे विरून जाणे

सौ. शालिनी मराठे

‘९.१२.२०२० या दिवशी एका साधिकेने मला एक वही आणून दिली आणि मला सांगितले, ‘‘काकू, तुमच्यासाठी एक सेवा आणली आहे. ही वही वाचायची आणि यातील सर्व लिखाण वाचून ‘जे चांगले आहे’, ते निवडायचे.’’ मी यापूर्वी कधी लिखाणाची निवड केलेली नव्हती. त्यामुळे माझ्या मनात अनेक प्रश्‍न उद्भवले आणि ते मी त्या साधिकेला विचारले. त्यावर ती मला म्हणाली, ‘‘काकू, संतांनीच ही सेवा तुम्हाला द्यायला सांगितली आहे.’’ हे वाक्य ऐकताच माझ्या मनातील सर्व प्रश्‍नांचे बुडबुडे मनातच विरून गेले आणि मी ती सेवा स्वीकारली. त्यानंतर देवाला प्रार्थना करून मी वही चाळली. तेव्हा ‘आपले ग्रंथ (सनातनचे ग्रंथ) फार वरच्या स्तरावरचे आहेत. आपल्या ग्रंथांसाठी यातील काहीच लिखाण घ्यायला नको’, असा प्रबळ विचार मनात आला, तरीही ‘संतांनी लिखाण निवडायला का बरे सांगितले असेल ?’, हा विचार मनात तसाच राहिला. त्याचे उत्तरही देवानेच सुचवले. ते पुढे दिले आहे.

२. वहीतील लिखाण निवडण्यासाठी हातात घेतल्यावर ‘समाजातील सर्वसामान्य लोकांसाठी त्यांना समजेल, अशा भाषाशैलीत हे लिखाण आहे. त्यामुळे समाजासाठी हे लिखाण फार उपयोगी आहे. ही व्यक्ती भक्त असून समाजोद्धाराची त्यांना तळमळ लागली आहे’, असा विचार मनात आला.

३. ‘परात्पर गुरु डॉक्टर श्रीविष्णूचे अवतार, भक्तवत्सल आणि करुणासागर असल्याने ते ह.भ.प. सखारामबुवा बांद्रे महाराज यांची ग्रंथ छापण्याची इच्छा पूर्ण करतील’, असा विचार मनात येणे

त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर हे भगवान श्रीविष्णूचे अवतार असून ते भक्तवत्सल आहेत, ते करुणासागर आहेत. या भक्तांची इच्छा ‘या ज्ञानाचा ग्रंथ छापावा’, अशी असल्यामुळे परात्पर गुरु डॉक्टर आता या लिखाणाचे (ज्ञानाचे) ग्रंथ सिद्ध करतील आणि छापतील.’ ‘वह्या किती आहेत ? कुणाच्या आहेत ?’, हे ठाऊक नसतांना देवाने दिलेली ही पूर्वसूचनाच होती. नंतर मला कळले की, ते लिखाण निवळी गावातील (जिल्हा रत्नागिरी) प्रसिद्ध प्रवचनकार ह.भ.प. सखारामबुवा बांद्रे महाराज यांचे आहे. देवानेच ही सेवा दिली आणि देवच ती करवून घेणार होता.

‘देवा, तुझी लीला आम्ही सामान्य माणसे काय जाणणार ? तुझ्या कृपेनेच तुझ्या चरणांजवळ रहायचे भाग्य आम्हाला मिळाले आहे देवा ! त्या तुझ्या कृपेसाठी कोटीशः कृतज्ञता !’

– गुरुचरणी शरणागत,

सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक