सोनम वांगचूक यांनी निर्माण केले लडाख सीमेवरील सैनिकांसाठी खास तंबू !

उद्धव ठाकरे यांसह अनेकांकडून कौतुक !

सोनम वांगचुक

मुंबई – लडाखमधील सोनम वांगचूक यांनी तेथील बर्फाच्छादित सीमेवर तैनात सैनिकांसाठी थंडीपासून बचाव करणार्‍या पर्यावरणपूरक तंबूचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. संपूर्णपणे देशी बनावटीचे ‘सोलर हिटेड मिलेट्री टेन्ट’ नावाचे हे तंबू सौरऊर्जेवर हिटरचा वापर करून बनवण्यात आले आहेत. यांचे वजन ३० किलोहून अल्प असून यात एका वेळी १० सैनिक राहू शकतात. ते कुठेही घेऊन जाऊ शकतो, अशा प्रकारचे आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ही आहे देशभक्ती, हे आहे देशप्रेम. तुमची जिद्द आणि समर्पण यांना सोनमजी सलाम ! निसर्गाच्या प्रकोपाला तोंड देतांनाच, देशाच्या सीमेवर कुरघोड्या करणार्‍या शत्रूलाही जरब बसवण्यासाठी आपले जिगरबाज सैनिक डोळ्यांत तेल घालून सतर्क असतात. या सैनिकांचा आणि पर्यावरणीय समतोलांचा विचार करून तुम्ही संशोधित केलेल्या सुविधा निश्‍चितच महत्त्वपूर्ण ठरतील’, अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले आहे. महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा यांच्यासह अनेकांनी सोनम वांगचूक यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.