मुंबई, २० फेब्रुवारी (वार्ता.) – लाल किल्ल्यावरील तिरंग्याच्या झालेल्या अपमानावरून देहलीतील शेतकर्यांचे आंदोलन हे देशद्रोह्यांचे आंदोलन झाले आहे. अशा देशद्रोही आंदोलनाला नाना पटोले यांनी कदापी समर्थन देऊ नये. तांडव वेब सीरिज, तसेच पद्मावती, पिके, जोधा अकबर यांसारख्या चित्रपटांत हिंदु धर्माचे वस्त्रहरण होत होते, तेव्हा नाना पटोले झोपले होते का ? असा प्रश्न महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजयसिंह सेंगर यांनी उपस्थित केला आहे.
सेंगर म्हणाले, ‘‘नाना हे सर्व प्रसिद्धीसाठी करत आहेत. महाराष्ट्रात अभिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांच्या चित्रपटांना करणी सेना संरक्षण देईल. वेळ पडल्यास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सडेतोड उत्तर देऊ. नाना पटोले यांच्या गुंडगिरीला त्याप्रमाणेच उत्तर देऊ.’’
केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता असतांना इंधनाच्या वाढत्या किमतीविषयी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांनी त्यावर टिपणी केली होती. सध्या इंधनाच्या वाढत्या किमतीविषयी मात्र ते गप्प आहेत, असा आरोप करत काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘महाराष्ट्रात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही’, अशी चेतावणी दिली आहे. यावरून सेंगर यांनी हिंदु धर्म आणि देवता यांचा अवमान करण्यात आलेल्या चित्रपटांविषयी नाना पटोले यांनी कधी अशी भूमिका का घेतली नाही, याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.