दिशाहीन झालेली राष्ट्राची पिढी !

सध्या आपल्या राष्ट्राची नवीन पिढी नीतीमत्ताहीन झाली आहे. मुले कार्टूनसारख्या विकृत कार्यक्रमांच्या आहारी जात आहेत. मुलांमध्ये स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा राहिलेली नाही. मी आणि माझे अशा संकुचित मानसिकतेची, हिंसक, संस्कारहीन पिढी निर्माण होत आहे. याच मानसिकतेमधून पुण्यामधील कोथरूड भागातील १३ वर्षांच्या मुलाने ११ वर्षांच्या मुलाची किरकोळ वादातून हत्या केल्याची घटना नुकतीच उघड झाली. या घटनेच्या अन्वेषणाच्या वेळी संबंधित मुलाने दृश्यम् चित्रपट भ्रमणभाषवर डाऊनलोड करून वारंवार पहात त्याप्रमाणे कृती केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी १३ वर्षांच्या मुलाला अटक केली असून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले. यासारख्या घटनांचे वाढते प्रमाण हे भावी पिढीचे किती झपाट्याने अधःपतन होत आहे, हे दर्शवते.

आताच्या धावपळीच्या युगात अशी संस्कारक्षम पिढी निर्माण न होण्याची अनेक कारणे आहेत. आई-वडिलांना नोकरीमुळे मुलांकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे घरात संस्कार करणारे आजी-आजोबाच नाहीत. त्यामुळे मुले लहान असतील, तर पाळणाघरात ठेवली जातात किंवा घरात बसून दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम बघण्यात स्वत:चा वेळ घालवतात. त्यात केबल, इंटरनेट, व्हिडिओ गेम घरोघरी आल्याने ही आधुनिक साधनेच मुलांच्या कोवळ्या मनावर कुसंस्कार करू लागली आहेत. पराकोटीची अश्‍लीलता, हिंसाचार, गुन्हेगारीचे भडक चित्रण ही आजच्या चित्रपटांची ओळख बनली आहे. निराशा, अपयश आल्यावर मृत्यूला कवटाळायचे असते, याचे धडे मुलांना अशा चित्रपटांतून मिळू लागले आहेत. याउलट पाश्‍चात्त्य समाज हिंदु धर्माने दिलेली संस्कृती, संस्कृत भाषा, अध्यात्म, भगवद्गीता आदी अनेक गोष्टींकडे जागतिक देणगी म्हणून पहात आहे.

प्रचलित शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थी मानसिक रुग्ण बनत चालला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे मन व्यापक होईल, असे शिक्षण त्यांना देणे आवश्यक आहे. आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण आहे. त्यांनी श्री भवानीमातेची उपासना करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. क्रांतीकारक आणि संत यांच्या चरित्राचा समावेश अभ्यासक्रमात अधिक हवा. तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये पालट घडून येऊ शकतो, तसेच त्याला धर्मशिक्षणाची जोड मिळाल्यास परिणाम अधिक लवकर साध्य होऊ शकतो !

– श्री. सुनील ओजाळे, पुणे