सातारा, १९ फेब्रुवारी (वार्ता.) – खटाव तालुक्यात दरजाई या गावात मित्रांच्या सहकार्याने वडिलांची हत्या करणार्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिसांनी अटक केली आहे. पवन सत्रे, सौरभ कदम आणि युवराज जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, १७ फेब्रुवारी या दिवशी खटाव तालुक्यातील दरजाई गावातील शेतकरी संपत गुलाब सत्रे हे शेतातील काम संपवून घरी निघाले होते. या वेळी अंधाराचा लाभ घेत काही अज्ञातांनी त्यांच्या डोक्यात वार करून त्यांची हत्या केली होती. पोलिसांनी खबर्यांचा उपयोग करून संपत सत्रे यांचे चिरंजीव पवन सत्रे यांना कह्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर पवन यांनी वडिलांची हत्या केल्याचे मान्य केले. शेतभूमी विकून पैसे देत नसल्याच्या कारणावरून मित्रांच्या सहकार्याने वडिलांची हत्या केली. (समाजाची नीतीमत्ता किती खालावली आहे, याची ही घटना उदाहरण आहे. समाजाची ही दु:स्थिती दूर करण्यासाठी समाज धर्मशिक्षित करणे आवश्यक आहे. – संपादक) तसेच वडील घसरून पडल्याचे भासवण्यासाठी त्यांच्या डोक्याखाली दगड ठेवला, असे पवन यांनी पोलिसांना सांगितले. भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.