मडगाव, १६ फेब्रुवारी (वार्ता.) – कुख्यात गुंड अन्वर शेख उपाख्य टायगर याच्यावर १६ फेब्रुवारीला आके, मडगाव येथे दिवसाढवळ्या वर्दळ असलेल्या रस्त्यावर आक्रमण करण्यात आले. चार सदस्य असलेल्या एका टोळीने हे आक्रमण केले. यात कुख्यात गुंड अन्वर शेख गंभीररित्या घायाळ झाला आहे. अन्वर शेख याला उपचारासाठी प्रथम हास्पिसियो रुग्णालयात आणि नंतर बांबोळी येथील गोवा विद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले आहे.
पोलिसांनी या प्रकरणी संशयित रिकी हार्णेकर याला कह्यात घेतले आहे; मात्र इतर आक्रमणकर्ते फरार झाले आहेत. पोलिसांनी आक्रमणासाठी वापरण्यात आलेले कोयतेही कह्यात घेतले आहेत. दोन गटांमधील भांडणाचा परिपाक असल्याचा पोलिसांचा कयास आहे. कुख्यात गुंड अन्वर याचा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे. अनेकदा पोलिसांनी त्याला कह्यातही घेतले आहे. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.