भारतात प्रत्येक १५ मिनिटाला एक मुलीवर बलात्कार ! – ‘ऑक्सफेम’ या जागतिक विश्‍लेषण संस्थेचा दावा

  • कुठे रामराज्यात मध्यरात्रीही अंगावर सोन्याचे दागिने घालून एकटी जाऊ शकणारी महिला, तर कुठे आताच्या काळात दिवसा सामान्य स्थितीतही घराबाहेर पडू न शकणार्‍या महिला !
  • जनतेला आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी साधना न शिकवल्यामुळे जनता अनैतिक कृत्य करत आहे, हेच यातून लक्षात येते !

नवी देहली – देहलीमध्ये वर्ष २०१३ मध्ये धावत्या बसमध्ये घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर हेल्पलाइन, ‘क्रायसिस सेंटर’पासून ‘निर्भया फंड’देखील स्थापन झाले; परंतु हा निधी १३० कोटींपैकी निम्म्या लोकसंख्येसाठीही पुरेसा नाही. त्यानंतरही देशात प्रत्येक १५ मिनिटाला एक मुलीवर बलात्कार होत आहे, असा दावा ‘ऑक्सफेम’ या जागतिक विश्‍लेषण संस्थेने तिच्या अहवालात केला आहे.

१. संस्थेमधील तज्ञ अमिता पित्रे म्हणाल्या की, भारतात ३ वर्षांत प्रति महिला सुरक्षेवर सरासरी ३० रुपये खर्च केले गेले. सुमारे ८ कोटी महिला किंवा मुली लैंगिक हिंसाचाराला तोंड देत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी सरासरी १०२ रुपये खर्च केला जातो. एकूण विचार केल्यास ही रक्कम नगण्य आहे. कोरोना महामारीचा विचार करून देशात महिलांवर होणारे अत्याचार आणि बेरोजगारीच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यानंतरही महिलांविषयी सरकारने वर्ष २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात तोकडी तरतूद केली आहे. महिलांसाठी खाद्य सुरक्षा, सामाजिक सुरक्षा आणि त्यातून होणार्‍या हिंसाचाराच्या विरोधात पावले उचलण्याची आवश्यकता होती; परंतु तसे घडून आले नाही.

२. देशात वर्ष २०१८ मध्ये बलात्काराच्या ३४ सहस्र घटनांची नोंद झाली. ८५ टक्के प्रकरणांत आरोप निश्‍चित झाले आणि केवळ २७ टक्के लोकांना शिक्षा होऊ शकली. देशात महिला तत्काळ साहाय्य मिळवून देणारे केवळ ६०० ‘वन स्टॉप क्रायसिस सेंटर’ कार्यरत आहेत.