दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीत ‘ब्राह्मण समाजाचा विचार केंद्र सरकारनेही करावा’, या मागणीचा विचार ठळकपणे नमूद केला गेला. अन्य अनेक विषयांचा ऊहापोह करण्यासमवेतच या रास्त मागणीकडेही केवळ जातीयवादी दृष्टीकोन न बाळगता व्यापक दृष्टीकोन ठेवून स्वत:ची भूमिका या दैनिकाने नमूद केली आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ हेच व्यापक हिंदुत्वाचे वारसदार ठरते ते यामुळेच ! म्हणूनच ते अभिनंदनीय आहे.
१. वास्तविक आज हिंदुत्वाचा विचार मांडणे, हेच प्रतिगामीपणाचे लक्षण मानले जाते. अशा परिस्थितीत आपला हिंदुत्वाचा जागर एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे ‘सनातन प्रभात’ने टिकवून ठेवला आहे. हिंदु धर्मातील प्रमुख घटक असणार्या ब्राह्मण समाजाविषयी काहीतरी अयोग्य बोलले किंवा लिहिले की, ‘आपण पुरोगामी आणि अधिक व्यापक बनलो’, असा चुकीचा पायंडा राजकीय पक्षामध्ये, तसेच काही सन्माननीय अपवाद वगळता हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्येही दुर्दैवाने पडत चालला आहे.
२. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘शेंडी, जानवेवाले हिंदुत्व आम्हास मान्य नाही’, अशा प्रकारचे वक्तव्य काही दिवसांपूर्वीच केले होते. हिंदुत्व हे कधीही शेंडी-जानव्यापुरते मर्यादित नव्हते आणि नसेलच; परंतु ब्राह्मणांनी शेकडो वर्षांनंतरच्या आक्रमणातही आपले शेंडी, जानवे आणि वेद रक्षणाचे कार्य, धर्माचे कार्य टिकवून ठेवले.
३. कोल्हापूर येथील काही धर्मबुडव्या लोकांकडून आंदोलन झाले, त्या आंदोलनाचा आधार घेऊन भाजपचे चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ची प्रतिमा अधिकाधिक व्यापक होण्यासाठी ब्राह्मण समाजाच्या पुजार्यांचा कोणताही विचार न करता, त्यांनी दिलेल्या योगदानाचा कोणताही सारासार विचार न करता विधीमंडळात पुजार्यांविरुद्ध कायदा संमत करून घेतला. ही काही ठराविक उदाहरणे आहेत.
४. पुरोगाम्यांमधील ब्राह्मणद्वेषाची लागण दैनिक ‘सनातन प्रभात’सारख्या काही सन्माननीय अपवाद वगळता हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणार्यांना झाली आहे, हे दुर्दैवाने इथे नमूद करावे लागते.
५. ब्राह्मण समाज जर प्रस्थापित म्हणून गणला जात असेल (वास्तविक ब्राह्मण समाज आजही अनेक समस्यांना तोंड देत स्वत:चे जीवन कंठित आहे.), तर आदर्श अशा समाज संरचनेत विस्थापितांना प्रस्थापितांच्या बरोबरीत आणणे, हे काम समाजधुरिणांचे आणि शासनकर्त्यांचे असायला हवे; परंतु सध्याचे तथाकथित समाजधुरीण ‘प्रस्थापितांना विस्थापित करणे’ या मार्गाचा अवलंब करत आपण समानतेचा पुरस्कार करत आहोत, असे भासवू लागले आहेत.
६. ब्राह्मण समाजातील महापुरुषांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी दिलेले योगदानही नाकारले जात आहे. किंबहुना त्यांच्यावर होणार्या चिखलफेकीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे. अशा वेळी काही ब्राह्मण संघटना स्वत:च्या शक्तीनुसार काही ठिकाणी विरोधही करत आहेत; पण त्यांचा आवाज यांच्या गोंधळात अतिशय क्षीण बनला आहे.
७. याच वेळेस व्यापक हिंदुत्वाचा विचार करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ने ब्राह्मण समाजाच्या काही अडचणींविषयी जी सहानुभूती दर्शवली, त्याविषयी आम्ही ‘पेशवा युवा मंच’ आणि समस्त ब्राह्मण समाज यांच्या वतीने आपले अभिनंदन आणि आभार व्यक्त करत आहोत.
८. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या नेतृत्वाखाली हिंदु राष्ट्राच्या चळवळीत प्रत्येक समाजाचे अमूल्य असे योगदान आहेच, त्यात ब्राह्मण समाजाचाही खारीचा वाटा असणार आहे. कोणत्याही समाजावर अन्याय न होईल, अशा व्यापक विचारसरणीचे हिंदु राष्ट्र, ईश्वरी राज्याचे अधिष्ठान दैनिक ‘सनातन प्रभात’ला आहे. त्यामुळेच ते खर्या अर्थाने सर्वसमावेशक आहे. अशा या दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातन संस्था यांचे पुन्हा अभिनंदन अन् त्यांच्याप्रती सहृदय कृतज्ञता !
– श्री. गणेश लंके, सचिव, पेशवा युवा मंच, पंढरपूर, सोलापूर.