गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाची कारवाई
पुणे – दळणवळण बंदीच्या काळात ‘खासदार अमोल कोल्हे बोलतोय’, अशी बतावणी करत एका बांधकाम व्यावसायिकाला फसवण्याचा प्रयत्न करणार्या विशाल अरुण शेंडगे याला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याचा साथीदार सुरेश बंडू कांबळे याचाही शोध पोलीस घेत आहेत. त्याने यापूर्वी आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फसवणूक केली आहे. तसेच शेंडगे याच्या विरोधात यापूर्वी ७ गुन्हे नोंद आहेत. त्यात तो जामिनावर सुटला होता. (पहिल्याच गुन्ह्याच्या वेळी कठोर कारवाई झाली असती, तर पुढील गुन्हे करण्याचे गुन्हेगाराचे असे धाडस झाले नसते. – संपादक)
‘गेरा बिल्डर्स’चे व्यवस्थापकीय संचालक रोहितकुमार गेरा यांना ‘खासदार अमोल कोल्हे बोलतोय’, असे म्हणत नागरिकांना काही तरी साहाय्य करा, निधी द्या’, असे सांगून फसवण्याचा प्रयत्न केला. गेरा यांना या दूरभाषविषयी शंका आल्यानंतर त्यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली.