एकदा जर उद्रेक झाला, तर थांबवणार कोण ?

मराठा आरक्षण प्रश्‍नी उदयनराजेंची चेतावणी

उदयनराजेंची चेतावणी

सातारा, २९ जानेवारी (वार्ता.) – दुसर्‍यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण देऊ नका. आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण द्या. एकदा जर उद्रेक झाला, तर थांबवणार कोण ? अशी चेतावणी भाजप खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार छत्रपती उदयनराजे पुढे म्हणाले की, अधिकाधिक गुण मिळवूनही मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. सरकारी नोकरीतही मराठा उमेदवारांना डावलले जात आहे; पण आता आमचा अंत पाहू नका.

राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आरक्षणासाठी लढा महत्त्वाचा ! – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, आरक्षणामध्ये राजकारण नको. मराठा समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. आरक्षणापासून मराठा समाज वंचित रहावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले; पण आता राजकीय अभिनिवेश बाजूला ठेऊन मराठा आरक्षणासाठी लढणे आवश्यक आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी केलेले प्रयत्न विसरून चालणार नाही.

तिन्ही राजेंनी मराठा आरक्षणाचे नेतृत्व करून ठाकरे सरकारला दणका द्यावा ! – नरेंद्र पाटील

या वेळी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील म्हणाले की, आघाडीच सरकार असल्याने महामंडळ बरखास्त होणे, ही कारवाई अपेक्षित होती. त्यामुळे याच उद्देशाने अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनची स्थापना केली. अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या माध्यमातून मराठा समाज आणि माथाडी कामगार यांच्या अडचणी सोडवल्या जातील. तसेच तिन्ही राजेंनी मराठा आरक्षणाचे नेतृत्व करून ठाकरे सरकारला दणका दिला पाहिजे.