गूगल भाषांतराच्या मर्यादेमुळे भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर खासदार रक्षा खडसे यांचा नावाचा आक्षेपार्ह अर्थ !

रक्षा खडसे (डावीकडे), गृहमंत्री अनिल देशमुख (उजवीकडे)

मुंबई – भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख झाला आहे. त्यांच्या नावापुढे रावेर (महाराष्ट्र) असा उल्लेख आहे; मात्र गूगल ट्रान्सलेटर अशी भाषांतर सुविधा देऊन संबंधित संकेतस्थळ पाहिल्यावर इंग्रजीमध्ये रावेर या ठिकाणी होमोसेक्शुअल (समलिंगी) असा शब्द येत आहे. त्यामुळे त्यांचे नाव आक्षेपार्ह होत आहे. गूगल भाषांतरामुळे हा सगळा गोंधळ निर्माण झाल्याचे दिसत आहे.

पत्रकार स्वाती चतुर्वेदी संबंधित स्क्रीनशॉट जोडत ट्वीटमध्ये म्हणाल्या, भाजपचे अधिकृत संकेतस्थळ कोण चालवते ? त्यात रक्षा खडसे यांच्यासमवेत गे समुदायाचाही अवमान करण्यात आला आहे. (घिसडघाईने हास्यास्पद ट्वीट करणारे पत्रकार ! – संपादक)   

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची नोंद घेतली आहे. भाजपने संबंधित दोषींवर तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर विभाग पुढील कारवाई करील, असे अनिल देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

गृहमंत्र्यांच्या पोस्टवर रक्षा खडसे यांची अप्रसन्नता ! 

जळगाव – अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा मिळालीच पाहिजे. त्यांनी संकेतस्थळावरील आक्षेपार्ह उल्लेखाची नोंद घेतली, ही चांगली गोष्ट आहे; मात्र त्यांनी ती आक्षेपार्ह पोस्ट इतरांना पाठवायला नको होती, अशा शब्दांत भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी अप्रसन्नता व्यक्त केली. २८ जानेवारी या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, राजकारणात असतांना स्वतःविषयी चांगल्या गोष्टी घडत असतात आणि काही यंत्रणांच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी घडत असतात. ही गोष्ट घडून गेली आहे. ती फार मोठी करण्यासारखी नाही. या प्रकरणाची आता चौकशी होत आहे. जो कुणी व्यक्ती यात दोषी असेल, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे मला वाटते. हा विषय फक्त माझ्यापुरता नाही, तर देशात रहाणार्‍या प्रत्येक महिलेविषयी आहे. महिलेची अपकीर्ती करण्याचे कृत्य व्हायला नको.