|
पणजी, २५ जानेवारी (वार्ता.) – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने गोवा विधानसभेच्या ४ दिवसीय हिवाळी अधिवेशनाला २५ जानेवारी या दिवशी प्रारंभ झाला.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचा प्रारंभ राष्ट्रगीताने झाला. त्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी प्रकृतीच्या कारणास्तव केवळ ३ मिनिटे भाषण करून पुढील भाषण विधानसभेच्या पटलावर ठेवले. त्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सभागृहातून बाहेर गेले. राज्यपाल कोश्यारी यांनी अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवल्यानंतर विरोधकांनी अधिवेशनाचा कालावधी घटवल्याने शासनाचा निषेध केला. विरोधक सभागृहात काळ्या फिती बांधून आणि हातात गोंयात कोळसो नाका या आशयाचे हस्तफलक घेऊन आले होते. या वेळी सल्लागार समितीचा अहवाल संमत करण्यात आला. सत्राच्या अखेर हल्लीच दु:खद निधन झालेल्या महनीय व्यक्तींच्या दुखवट्याविषयी, तसेच कोरोना महामारीच्या काळात कोरोनाचा संसर्ग झाल्याने निधन झालेल्यांविषयी दुखवट्याचा ठराव विधानसभेत मांडण्यात आला. या वेळी
१ मिनिट स्तब्धता पाळण्यात आली. अखेर आमदार ग्लेन टिकलो यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करणारा ठराव मांडला. त्यानंतर बुधवार, २७ जानेवारी सकाळपर्यंत अधिवेशनाचे कामकाज स्थगित करण्यात आले.
प्रारंभी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले, गतवर्षी अधिवेशन ५ दिवसांचे होते आणि आता केवळ ४ दिवसांचे भरवले जात आहे. राज्यात अनेक समस्यांना अधिवेशनात वाचा फोडणे आवश्यक आहे.
गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव म्हणाले, कोळसा विषयावर विधानसभेत चर्चा होणे आवश्यक आहे. काँग्रेसचे लुईझीन फॉलेरो म्हणाले, कोळसा प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलावण्याविषयी मी राज्यपालांना पत्र लिहिले आहे. मगोपचे नेते श्री. सुदिन ढवळीकर म्हणाले, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधी पक्षांनी अधिवेशनात ५ लक्षवेधी सूचना मांडण्याची मागणी केली होती; मात्र प्रत्यक्षात अधिवेशनाच्या कामकाजात तीनच लक्षवेधी सूचनांची नोंद आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणातील सूत्रे
कोरोना महामारीनंतर गोव्याची स्थिती पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर ! – भगत सिंह कोश्यारी, राज्यपाल
कोरोना महामारीनंतर गोव्याची स्थिती पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर आहे. कोरोना महामारीमुळे राज्याला सामाजिक आणि आर्थिक स्तरांवर मोठ्या प्रमाणावर फटका बसला. राज्यातील पायाभूत विकास प्रकल्पांची कामेही रखडली; मात्र राज्यशासनाने यावर त्वरित उपाययोजना काढल्याने ही स्थिती आता पूर्वपदावर येऊ लागली आहे. कोरोना महामारीने सर्वांना आत्मनिर्भर रहाण्याची शिकवण दिली. वर्ष २०१७-१८ मध्ये नोटबंदी आणि आर्थिक मंदी असूनही ग्रॉस स्टेट डॉमेस्टीक प्रॉडक्ट (जी.एस्.डी.पी.) ६९ सहस्र ३५२ कोटी रुपये होता. वर्ष २०१६-१७ च्या तुलनेत यामध्ये ९.२९ टक्क्यांनी वाढ झाली. वर्ष २०१८-१९ या काळात ग्रॉस स्टेट डॉमेस्टीक प्रॉडक्ट ७३ सहस्र १७० कोटी रुपये होता. वर्ष २०१७-१८ च्या तुलनेत यामध्ये ५.५१ टक्क्यांनी वाढ झाली. संपूर्ण देशात गोव्याची दरडोई कमाई सर्वाधिक आहे. वर्ष २०१७-१८ मध्ये दरडोई कमाई ४ लाख ५४ सहस्र रुपये होती आणि वर्ष २०१८-१९ मध्ये ती ४ लाख ७६ सहस्र रुपये झाली. खाण उद्योगाचा राज्याच्या आर्थिक क्षेत्रात मोठा वाटा आहे. खाण उद्योगाचा वर्ष २०११-१२ मध्ये राज्याच्या जी.एस्.डी.पी.मध्ये १६ टक्के वाटा होता आणि वर्ष २०१९-२० मध्ये तो ०.२ टक्के होता. पर्यावरण, नैसर्गिक स्रोत आणि खाण क्षेत्रातील नागरिकांचे आरोग्य यांचे जतन करून शासन खाण उद्योग शिस्तबद्धरित्या चालू करण्याच्या प्रयत्नात आहे.