ओबीसींची जातीनिहाय जनगणना हवी ! – पंकजा मुंडे, नेत्या, भाजप

पंकजा मुंडे

संभाजीनगर – ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हायला हवी. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे नेते दिवंगत गोपिनाथ मुंडे यांची अशीच मागणी होती. या संदर्भात त्यांनी संसदेत वेळोवेळी प्रश्‍नही उपस्थित केले होते. भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनीही या संदर्भात वेळोवेळी मागणी केली आहे. त्यामुळे सध्या जनगणना जवळ आली असून ती जातीनिहाय व्हावी, अशी मागणी भाजपच्या नेत्या सौ. पंकजा मुंडे यांनी २५ जानेवारी या दिवशी येथे केली, तसेच या जनगणनेमुळे समाजाला न्याय देण्यास साहाय्य होईल, असेही त्या म्हणाल्या.

धनंजय मुंडे प्रकरण संवेदनशील असल्याने त्याचे मी राजकीय भांडवल करणार नाही !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने केलेल्या आरोपाविषयी पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘धनंजय मुंडे प्रकरणाचा विषय मागे पडला आहे. नैतिक, कायदेशीर आणि तात्त्विकदृष्ट्या या गोष्टींचे मी समर्थन करू शकत नाही. तरी अशा गोष्टीने कुटुंबाला त्रास होतो. नातं आणि महिला म्हणून मी या गोष्टीकडे संवेदनशीलपणे पहाते. हा विषय कुणाचाही असता, तरी राजकीय भांडवल केले नसते आणि करणारही नाही. बाकी इतर गोष्टींचा निकाल भविष्यात लागलेच.