पाळी येथील श्री नवदुर्गा देवस्थानचा आज कालोत्सव

देऊळवाडा, पाळी, गोवा येथील श्री नवदुर्गादेवीचा कालोत्सव २६ जानेवारी २०२१ या दिवशी साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. कालोत्सवाच्या निमित्ताने श्री नवदुर्गा देवस्थानची माहिती जाणून घेऊया.

संकलक – श्री. नारायण यशवंत नाडकर्णी, फोंडा, गोवा.

श्री नवदुर्गादेवी

पाळी गावातील श्री नवदुर्गादेवीचे मंदिर हे कधी बांधले, याविषयी वेगवेगळे अंदाज वर्तवले जातात. पाळी, तळेवाडा येथील वयोवृद्ध नागरिक कै. पांडुरंग जयवंत प्रभु यांनी हे मंदिर अतीप्राचीन असून याला किमान एक सहस्र वर्षे झाली, असा अंदाज व्यक्त केला होता. मंदिराच्या पुजार्‍याच्या म्हणण्यानुसार श्री नवदुर्गा मंदिरात पूजा करणारी त्यांची ही सहावी पिढी असून, पुराभिलेख पुरातत्व निर्देशनालय पणजी, गोवा यांच्या नोंदीनुसार श्री नवदुर्गादेवीचे मंदिर १६ डिसेंबर १९२९ या दिवशी बांधले गेले. या मंदिराचे मुख्य महाजन दळवी आणि गांवस कुटुंबीय आहेत. श्री नवदुर्गा देवस्थानचे पंचायतन श्री नवदुर्गा, श्री क्षेत्रपाल (याला पोर्तुगीज अपभ्रंशाप्रमाणे खेतरपालही म्हणतात.), श्री नारायण, श्री महादेव, श्री सातेरी आणि श्री रवळनाथ हे आहेत. श्री नवदुर्गादेवीला गार्‍हाणे घालतांना या सर्व देवतांचे स्मरण केले जाते. त्याचसमवेत ब्राह्मणी जोगेश्‍वरी असेही संबोधले जाते. पूर्वी गावात रोगराई पसरल्यास आणि गुराढोरांना रोग झाल्यास देवीला सामूहिक गार्‍हाणे घातले जात असे. हे गार्‍हाणे घातल्यानंतर गावातील अवर्षण दूर होते, अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे.

पाळी येथील श्री नवदुर्गादेवीचे अन्य उत्सव

फाल्गुन शुक्ल पक्ष पंचमीला स्थापना दिवस, नवरात्रोत्सवामध्ये प्रतिदिन नवरात्र पूजन अन् रात्री भजन, कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्दशीला दिवजांची जत्रा, तर कार्तिक शुक्ल पक्ष एकादशीला २४ घंटे अखंड भजनी सप्ताह चालू असतो. फाल्गुन पौर्णिमेला होळीचा उत्सव होतो. या दिवसांत पाच दिवस शिमगोत्सव अन् शेवटी घोडेमोडणीने या उत्सवाची सांगता होते.

जत्रोत्सवातील कार्यक्रम

जत्रोत्सवाच्या दिवशी २६ जानेवारीला सकाळी वर्षपद्धतीप्रमाणे सर्व धार्मिक विधी होतील. सायंकाळी ७ ते ८ भजन आणि रात्री १० वाजल्यानंतर पालखी होईल. रात्री महिलांचे नाटक होईल. २७ जानेवारीला गवळण काला आणि रात्री नाटक होईल. सर्व कार्यक्रम कोविड महामारीशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून केले जातील.