अर्णब गोस्वामी यांनी पार्थो दासगुप्ता यांना अनेकदा पैसे दिल्याचा पुरवणी आरोपपत्रात पोलिसांचा दावा

टी.आर्.पी. घोटाळा प्रकरण

अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता

मुंबई – रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बार्क) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना १२ सहस्र डॉलर (अनुमाने ८ लाख ७५ सहस्र रुपये) दिले होते. तसेच २ वर्षांमध्ये त्यांना एकूण ४० लाख रुपये दिले आणि ते रिपब्लिक वाहिनीच्या बाजूने ‘रेटींग’मध्ये फेरफार करण्यासाठी होते, अशी माहिती मुंबई पोलिसांनी प्रविष्ट केलेल्या पुरवणी आरोपपत्रातून पुढे येत आहे. पार्थो दासगुप्ता, रोमील रामगढिया, विकास खनचंदानी यांच्या विरोधात हे पुरवणी आरोपपत्र आहे.

११ जानेवारीला प्रविष्ट करण्यात आलेल्या ३ सहस्र ६०० पानांच्या पुरवणी आरोपपत्रात बार्कचा ‘ऑडिट रिपोर्ट’, तसेच दासगुप्ता आणि गोस्वामी यांच्यातील व्हॉट्सअप चॅट, बार्कचे माजी कर्मचारी आणि केबल ऑपरेटर यांसह ५९ जणांची विधाने, विविध वाहिन्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांद्वारे टी.आर्.पी.मध्ये केलेली फेरफार आणि ‘रेटिंगच्या फिक्सिंग’विषयीचे संवाद यांचा समावेश आहे.

पोलिसांना दिलेल्या जबाबात दासगुप्ता यांनी सांगितले, ‘‘रिपब्लिक टीव्हीला क्रमांक एकचे रेटींग मिळावे, यासाठी मी माझ्या टीमसमवेत काम करायचो आणि टी.आर्.पी.मध्ये फेरफार करायचो. हे जवळपास वर्ष २०१७ पासून वर्ष २०१९ पर्यंत चालू होते. वर्ष २०१७ मध्ये अर्णब गोस्वामी यांनी मला माझ्या कुटंबासमवेतच्या फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या सहलीसाठी जवळपास ६ सहस्र डॉलर (अनुमाने ४ लाख ३७ सहस्र रुपये) कॅश दिले. यानंतर वर्ष २०१९ मध्ये तेवढीच रक्कम दिली. वर्ष २०१७ मध्ये मला २० लाख रुपये दिले. वर्ष २०१८ आणि वर्ष २०१९ मध्ये त्यांनी मला प्रत्येक वेळी १० लाख रुपये दिले.’’