कोल्हापूर, २४ जानेवारी (वार्ता.) – उंचगाव, चिंचवाड परिसरात जुन्या साड्यांची गोदामे असून या साड्या रात्री-अपरात्री रसायनाच्या साहाय्याने नदीच्या पाण्यात धुण्यात येतात. अशा प्रकारे पाणी प्रदूषित करून, धुतलेल्या साड्या प्रेस करून प्रसिद्ध बाजारपेठेमध्ये दुकानात विक्रीसाठी ठेवून ग्राहकांची फसवणूक केली जाते. तरी अशा प्रकारे नदी प्रदूषित करणार्या आणि ग्राहकांची फसवणूक करणार्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी, करवीर विभाग यांचे स्वीय सहाय्यक श्री. संजय घोरपडे यांना देण्यात आले.
या वेळी शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, युवासेना तालुकाप्रमुख श्री. संतोष चौगुले, गांधीनगर प्रमुख श्री. दिलीप सावंत, विभागप्रमुख श्री. दीपक पोपटानी, शाखाप्रमुख दीपक अंकल, उपशाखाप्रमुख श्री. सुनील पारपाणी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, सर्वश्री योगेश लोहार, अजित चव्हाण, भूषण चौगुले, अजित पाटील, ओंकार जोशी उपस्थित होते.