(म्हणे) ‘ईश्‍वराची निर्मिती मासिक पाळीमुळे अशुद्ध ठरत नाही, याचे स्मरण चित्रपट करून देतात !’ – बंगाली अभिनेत्री ऋतांभरी चक्रवर्ती

  • मासिक पाळीच्या काळात महिलांतील रज-तम गुणांचे प्रमाण वाढलेले असते ! अशा वेळी त्या रज-तमाचा अन्यांवर परिणाम होऊ नये, यासाठी काही विधीनियम धर्माने सांगितले आहेत ! त्यांचा अभ्यास न करता त्याचा संबंध स्त्री-पुरुष समानतेशी जोडणे, हेच मोठे अज्ञान आहे !
  • शास्त्र समजून न घेता अशा प्रकारे घटनांचे चित्रण झाल्यामुळेच समाजाची दिशाभूल होते ! चित्रपट क्षेत्रातील लोक मासिक पाळीमुळे अपवित्रता निर्माण होते कि नाही याविषयी मत मांडतात हेच हास्यास्पद आहे. सर्व क्षेत्रांत तज्ञांचे म्हणणे ग्राह्य धरले जाते, धर्माच्या क्षेत्रात मात्र कुणीही उठतो आणि स्वतःची मते इतरांवर थोपवण्याचा प्रयत्न करतो !

पणजी – ईश्‍वराची कोणतीही निर्मिती केवळ मासिक पाळीमुळे अशुद्ध ठरत नाही, याची आठवण आपले चित्रपट आपल्याला करून देतात, असे मत ‘ब्रह्मा जाने गोपोन कोम्मोटी’ या बंगाली चित्रपटातील प्रमुख कलाकार ऋतांभरी चक्रवर्ती यांनी व्यक्त केले. येथे चालू असलेल्या ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फीतील) इंडियन पॅनोरमामध्ये फिचर फिल्म वर्गामध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला. त्यानंतर या चित्रपटाच्या दिग्दर्शक अरित्रा मुखर्जी, निर्माता शिबोप्रसाद मुखर्जी, पटकथाकार सम्राज्ञी बंडोपाध्याय, लेखिका झिनिया सेन आणि प्रमुख अभिनेते सोहम मुजुमदार यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

‘महिलांना सर्वत्र भेदभावाला सामोरे जावे लागते. पुजारी असलेल्या महिलेची ही कथा आहे. स्त्रियांच्या मासिक पाळीला निषिद्ध मानण्यासंदर्भातील समजूत नष्ट करण्याचा लेखिकेचा उद्देश आहे. ‘या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारायला मिळाली’, हा माझा सन्मान आहे’, अशी भावना ऋतांभरी चक्रवर्ती यांनी व्यक्त केली.

मासिक पाळीच्या काळात पुजारी म्हणून विधी करण्यासाठी प्रयत्न करणारी नायिका दाखवणारा धर्मद्रोही चित्रपट !

‘चित्रपटातील कथानायिका शबरी ही व्याख्याती, कलाकार आणि मुख्य म्हणजे पुजारी आहे. लग्नानंतर तिच्या जीवनात होणारे पालट स्वीकारण्यासाठी तिला कसे झगडावे लागले, तसेच पुजारी म्हणून विधी चालू ठेवण्यासाठीचे तिचे प्रयत्न या चित्रपटात विनोदी ढंगाने मांडण्यात आले आहेत. भारतीय समाजात मासिक पाळीला अद्यापही कसे निषिद्ध मानण्यात येते, हे दाखवण्यावर चित्रपटाचा प्रामुख्याने रोख आहे. मासिक पाळीमुळे धार्मिक विधीत भाग घेण्यास महिलेला नाकारण्यात आले. या घटनेपासून चित्रपटाचा प्रवास चालू झाला आहे.

‘पुरुषांनी एकत्रितपणे पाऊल उचलले नाही, तर स्त्री-पुरुष समान असलेल्या समाजाची निर्मिती आपण करू शकणार नाही’, असे मत चित्रपटात ‘विक्रमादित्य ही नायकाची भूमिका साकारणार्‍या सोहम मुजुमदार यांनी व्यक्त केले. (व्यक्ती केवळ स्त्री किंवा पुरुष असल्याने श्रेष्ठ, कनिष्ठ किंवा सम पातळीवर येत नाही, तर स्वतःच्या कर्माने स्वतःचे स्थान निर्माण करते, हेही न कळणारे अशी अज्ञानमूलक वक्तव्ये करतात ! – संपादक)