|
चंद्रपूर – येथील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी १९ जानेवारी या दिवशी रात्री नागपूर-चंद्रपूर मार्गावर मद्य तस्करी करणारी ६ चारचाकी वाहने आणि या वाहनांना पायलट करणारे १ चारचाकी वाहन पकडले. यावरून जिल्ह्यात मद्यबंदी केवळ कागदावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या पडोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे. पोलिसांनी या घटनेतील वाहक आणि चालक यांंना कह्यात घेतले आहे. (अवैध मद्य वाहतुकीची वाहने पकडण्याचे दायित्व आणि कर्तव्य पोलिसांचे असतांना एखादा लोकप्रतिनिधी ६ मद्य तस्करीची वाहने पकडतो आणि पोलिसांना मात्र ही वाहने पकडता येत नाहीत, हे पोलिसांना लज्जास्पद आहे. यावरून या मद्य तस्करांकडून पोलिसांचे हप्ते चालू असल्यामुळे ते त्यांच्यावर कारवाई करत नव्हते, असे कुणी म्हटल्यास त्यात चूक काय ? – संपादक)
१. आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्य मार्गावर पाळत ठेवून शहरात मद्य घेऊन येणार्या ७ चारचाकी वाहनांना अडवले.
२. शहराच्या वेशीवर असलेल्या पडोली चौकात आमदार जोरगेवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी गुप्त माहितीच्या आधारे हे अभियान राबवले.
३. या सर्व वाहनांत मद्यांची पेट्या भरलेली होती. मद्य भरलेली ही सर्व वाहने पडोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत.
४. मार्गातील अनेक पोलीस ठाणी आणि नाकेबंदी चुकवून शहराच्या अगदी जवळ पोचल्याने त्या वेळी बंदोबस्तात असणारे पोलीस काय करत होते ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (अशा पोलिसांना जनतेचे रक्षणकर्ते म्हणता येईल का ? – संपादक)
५. आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, या कारवाईची माहिती देण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकार्यांना दूरभाष केल्यावर त्या अधिकार्यांनी त्यांच्यासमवेत अवमानास्पद भाषेत संभाषण केले. (एखाद्या लोकप्रतिनिधीने असे कौतुकास्पद काम केल्यास त्यांचे अभिनंदन करण्याऐवजी उलट त्यांच्याशी अवमानास्पद बोलणारे पोलीस अधिकारी सामान्य जनतेशी कसे वागत असतील याचा विचारच न केलेला बरा. अशा पोलिसांना जनतेला खरोखर न्याय मिळतो का ? – संपादक)