मालाड हे मुंबईतील उपनगर. १६ व्या शतकातील काही ऐतिहासिक उल्लेखानुसार खारोडी, राठोडी, मालवणी आदी गाव मिळून मालाड वसले होते. या परिसराला मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास आहे. येथील पोर्तुगिजांनी बांधलेला माढ किल्ला मराठ्यांनी शौर्य गाजवून हस्तगत केला होता. आज येथील हिंदूंवर पुन्हा शौर्यजागरण करण्याची वेळ आली आहे; कारण या उपनगरातील मालवणी परिसर हे ‘छोटे पाकिस्तान’ बनले असून तेथील हिंदूंवर परागंदा होण्याची वेळ आली आहे. धर्मांधांचा दबाव, छळ आणि धमक्या यांना कंटाळून हिंदूंनी तेथून पलायन करण्यास आरंभ केला आहे. ही प्रक्रिया १० वर्षांपासून चालू आहे, हे गंभीर आहे. एवढ्या वर्षांत मुंबईसारख्या एका उपनगरातील परिसरात हिंदूंची दुःस्थिती होते आणि त्याकडे राजकारणी, प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून कानाडोळा केला जातो, हे संतापजनक आहे.
एखाद्या परिसरात गुन्हेगारी वाढली किंवा गुन्हेगारांचा त्रास होऊ लागल्यास प्रथम पोलिसांना संपर्क केला जातो. या १० वर्षांत मालवणीमधील हिंदूंनीही तेच केले; मात्र त्यांच्या पदरात फारसे काही पडलेले दिसत नाही. येथील सय्यद हशम या गुंडाचे राज्य आहे. त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यास तक्रार प्रविष्ट केल्यावर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला. हे हिंदूंना चीड आणणारे आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यात सुरक्षा हा केंद्रबिंदू असतो. मालवणी परिसरात अनधिकृत मशिदी, मदरसे यांना सरकारी यंत्रणांचे पाठबळ आहे, असेच म्हणावे लागेल. या परिसरात हिंदु मुली आणि महिला यांचा छळ केला जात असतांना पोलीस संबंधितांवर कारवाई करतांना दिसत नाही. हिंदूंना कडक नियम आहेत; मात्र अनधिकृत झोपडपट्ट्या बांधणारे, दहशत माजवणारे, अनधिकृत मशिदी बांधणार्यांचे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही. येथील धर्मांधांची दहशत मोडून काढण्याचे दायित्व पोलिसांचे असतांना पोलीस गप्प आहेत. त्यामुळे हिंदूंसमोर पलायन करण्याशिवाय आणखी वेगळा पर्याय नाही. काही दिवसांपूर्वी विश्व हिंदु परिषदेने ‘राममंदिर समर्पण निधी अभियाना’च्या अंतर्गत लावलेली श्रीरामाचे चित्र असलेली भित्तीपत्रके (पोस्टर) मुंबई पोलिसांनी काढून टाकली, तर काही भित्तीपत्रके फाडली. या भित्तीपत्रकांमध्ये आक्षेपार्ह काय होते ? मात्र पोलिसांनी ‘यात भावना भडकावणारे लिखाण होते’, असे सांगून कारवाई केली. श्रीराममंदिराचा निकाल हा हिंदूंच्या बाजूने लागून अयोध्येत श्रीराममंदिराचे बांधकाम चालू झाले आहे. त्या अनुषंगाने निधी उभारणे किंवा भित्तीपत्रके लावणे, यात चूक ते काय ? मात्र पोलिसांना धर्मांधांच्या धार्मिक भावना जपायच्या आणि हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवायच्या आहेत. भारतात धर्मांधांकडून हिंदू मार खात आहेत. यात हिंदूंची निष्क्रीयता कारणीभूत असली, तरी त्याहून पोलिसांची निष्क्रीयता अधिक गंभीर आहे. काश्मीरमध्ये धर्मांधांनी हिंदूंना धमकी दिल्यावर पोलीस आणि प्रशासन गप्प बसले. तेच पुढे कैराना आणि अन्य ठिकाणी घडत आहे. मालवणीमध्येही हेच घडत आहे. त्यामुळे भविष्यात ‘मालवणी’ हे नाव पुसले जाऊन त्याचे ‘इस्लामी’ वगैरे नाव ठेवले गेल्यास आश्चर्य वाटणार नाही. ही धोक्याची घंटा आहे. हिंदूंनी याचे गांभीर्य ओळखून आताच परिणामकारक संघटन उभारणे अपरिहार्य आहे.