अयोध्या येथील राममंदिर उभारणीसाठी निधी समर्पण अभियान ! – मिलिंद परांडे, विश्‍व हिंदु परिषद

पत्रकार परिषदेत बोलतांना मध्यभागी मिलिंद परांडे शेजारी अधिवक्ता रणजीतसिंह घाटगे (उजवीकडे)

कोल्हापूर, १६ जानेवारी (वार्ता.) – श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने अयोध्येला उभारण्यात येणार्‍या श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिराचे कार्य आता गतिमान झाले आहे. या प्रस्तावित ३ मजली मंदिरासाठी संपूर्ण भारतातून भक्तांचा सहभाग सुनिश्‍चित करण्यासाठी मकरसंक्रांतीपासून निधी समर्पण अभियान प्रारंभ झाले आहे. आहे. या अभियानाच्या अंतर्गत देशातील ११ कोटी कुटुंबांपर्यंत पोचण्याचा मानस आहे, अशी माहिती विश्‍व हिंदु परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी १५ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री अधिवक्ता रणजीतसिंह घाटगे, श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, ह.भ.प. भानुदास महाराज यादव आदी उपस्थित होते.

१. आर्थिक पारदर्शकता रहावी म्हणून रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने रुपये १ सहस्र, १०० रुपये आणि १० रुपयांच्या कुपन आणि पावती पुस्तके यांची रचना करून त्या माध्यमातून अधिकाधिक भक्तांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय ऑनलाईन निधी समर्पण व्यवस्थाही करण्यात आली आहे.

२. महाराष्ट्रात हे अभियान १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत होणार आहे. या अभियानामध्ये २ सहस्र संत, २ लाख रामभक्त हे सहभागी होणार आहेत.