जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने १८ जानेवारीपासून रस्ता सुरक्षा अभियान

सिंधुदुर्ग – वाहनचालकांसह नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, तसेच वाहतूक नियमांविषयी जनजागृती व्हावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी असा १ मास ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येणार आहे. शासनाच्या वतीने प्रतिवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येते. या कालावधीत वाहनचालक आणि नागरिक यांच्यामध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली जाते. शाळा-महविद्यालयांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जातात. यंदा रस्त्यावर वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागृती केली जाणार आहे. या वेळी माहितीपत्रक आणि पुस्तके यांचे वाटप केले जाणार आहे. यंदा कोरोना कालावधीमध्ये शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेतला जाणार नाही, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी सांगितले.