राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वच स्तरांमधील लोकप्रतिनिधींची नावे नेहमीच हत्या, भ्रष्टाचार, गैरवर्तन, अनैतिकता, बलात्काराचे आरोप यांमध्ये कायमच आघाडीवर असतात. डिसेंबर २०२० च्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर संभाजीनगर येथे बलात्काराचा गुन्हा नोंद झाला. हे प्रकरण चालू असतांनाच अन्य एका महिलेने महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला अन् तशी तक्रार पोलीस ठाण्यात दिली. हा आरोप झाल्यावर यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे धनंजय मुंडे यांनी ‘फेसबूक पोस्ट’मध्ये ‘मी एका महिलेसमवेत वर्ष २००३ पासून परस्पर सहमतीने संबंध ठेवत होतो. आम्हाला दोन मुले असून या मुलांना मी माझे नाव दिले आहे’, असा खुलासा केला आहे. या ‘फेसबूक पोस्ट’मुळे सामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
हिंदूंना द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू असल्याने कोणताही व्यक्ती पहिली पत्नी असतांना दुसरा विवाह करू शकत नाही. असे असतांना मुंडे यांच्या सांगण्याप्रमाणे विवाह न करता ते दुसर्या एका महिलेपासून झालेल्या मुलांना स्वत:चे नाव कसे काय लावू शकतात ? मुंडे हे आमदार असून निवडणूक लढवतांना त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. यात त्यांना किती मुले आहेत, हेही नमूद करावे लागते. मुंडे यांना पहिल्या पत्नीपासून ३ मुले आणि दुसर्या पत्नीपासून २ मुले अशी एकूण ५ मुले असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. ही मुले जर वर्ष २००१ नंतरची असल्यास तीनपेक्षा अधिक अपत्याची माहिती लपवणे, हा कायदेशीरदृष्ट्या गुन्हा ठरतो. त्यामुळे निवडणूक आयोगाने आता मुंडे यांचे प्रतिज्ञापत्र पडताळून पहाणे अत्यावश्यक आहे. भारतीय शपथेचा कायदा आणि प्रतिज्ञापत्राच्या संदर्भातील कायदा यांनुसार हा गंभीर गुन्हा असून उर्वरित अपत्यांचे उल्लेख नसल्यास राज्य निवडणूक आयोग मुंडे यांची आमदारकी रहित करण्याच्या दृष्टीने पावले उचलणार का ? हा प्रश्न सामान्यांच्या मनात घोंगावत आहे.
खुलेपणाने दुसर्या महिलेसमवेतच संबंधांविषयी समर्थन करून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला मान्यता देणार्या अनैतिक धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काढून घेतात का ? याकडेही महाराष्ट्रवासियांचे लक्ष आहे !
– श्री. अजय केळकर, सांगली.