मुख्यमंत्री कार्यालयाच्या टि्वटर हॅण्डलवर ‘धाराशिव-उस्मानाबाद’ असा उल्लेख

मुंबई – औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये मतभेद पुढे येत आहेत. आता उस्मानाबादच्या नामांतराचा मुद्दाही चर्चेत आला आहे. धाराशिवमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या टि्वटर हॅण्डलवर त्याची माहिती देतांना शहराचा उल्लेख ‘धाराशिव-उस्मानाबाद’ असा करण्यात आला आहे. यावरून शिवसेना शहरांच्या नामांतरणाच्या विषयी सकारात्मक असल्याचे दिसून येते आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद संदर्भात निर्णय झाला, तेव्हा काँग्रेसचा आक्षेप झुगारून त्याची माहिती देतांना मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटमध्ये संभाजीनगर असा उल्लेख होता.
याविषयी काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, आम्ही याविषयी एकत्र बसून चर्चा करू. कोणी संभाजीनगर बोलू दे, कोणी औरंगाबाद बोलू दे, कोणी धाराशिव बोलू दे किंवा कोणी उस्मानाबाद बोलू दे. यामुळे महाविकास सरकारला काही फरक पडणार नाही, हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे.