सनातनचे पनवेल येथील साधक डॉ. दीपक जोशी ʻकोरोना योद्धाʼ पुरस्काराने सन्मानित

बेंगळुरू येथील ʻस्मृती साधनाʼ या स्वयंसेवी संस्थेकडून पुरस्कार

डॉ. दीपक जोशी यांना पुरस्कार देतांना रेणूताई गावस्कर, डावीकडे विवेक वेलणकर, मध्यभागी वीणा गोखले आणि सर्वांत उजवीकडे शिवकुमार ओझा

पुणे (वार्ता.) ११ जानेवारी – सहकार्य, सामंजस्य आणि संवेदनशीलता या गुणांमुळेच माणुसकी जिवंत आहे. माणुसकीच्या या गुणांमुळेच पूर्ण जगात हाहा:कार माजवणाऱ्या कोरोना महामारीच्या विरोधात समाजातील अनेक घटकांनी नि:स्वार्थपणे सेवा बजावली. या पार्श्वभूमीवर बेंगळुरू येथील ʻस्मृती साधनाʼ नावाच्या स्वयंसेवी संस्थेने अशा लोकांना ʻकोरोना योद्धाʼ पुरस्कार देऊन गौरविले आहे. सनातनचे पनवेल येथील साधक डॉ. दीपक जोशी यांनी लॉकडाऊनच्या काळात अनेक रुग्णांना समुपदेशन करणे त्यांना धीर देणे, साधना सांगून स्थिर जीवन जगण्याची दिशा देणे आदी विशेष प्रयत्न केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. डॉ. जोशी यांच्यासमवेत अन्य ४० जणांनाही हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

९ जानेवारी या दिवशी पुण्यातील नवी पेठ येथे असलेल्या पत्रकार भवनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी व्यासपिठावर सामाजिक कार्यकर्त्या रेणुताई गावस्कर, ʻसजग नागरिक मंचाʼचे अध्यक्ष, तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर, ʻदेणे समाजाचेʼ या संस्थेच्या संचालिका वीणा गोखले, तसेच ʻस्मृती साधनाʼ संस्थेचे संस्थापक शिवकुमार ओझा आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करणारे विविध आधुनिक वैद्य, पुढाकार घेऊन संशोधनासाठी स्वत:वर कोरोनाची लस लावून घेणारे, लॉकडाऊनच्या काळात कोरोनाच्या रुग्णांची प्रत्यक्ष सेवा करणारे सर्वसामान्य नागरिक, अडचणीत असलेल्या गोरगरिबांना दूध, भाजीपाला, औषधे इत्यादी पुरवणारे अशा विविधांगी स्तरावर समाजकार्य करणाऱ्या नागरिकांचा अन् स्वयंसेवी संस्थांचा यामध्ये समावेश होता. पुरस्कार प्रदान सोहळा यशस्वी करण्यासाठी ʻस्मृती साधनाʼ संस्थेच्या अश्विनी कुलकर्णी, अवंतिका हिरेमठ, शिल्पा देशपांडे आदींनी परिश्रम घेतले.

पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. दीपक जोशी म्हणाले, ʻʻकोरोनाच्या काळात रुग्णांना साहाय्य करणे, त्यांना मानसिक आधार देणे, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच मी करू शकलो. केवळ साधना केल्यानेच मनुष्य कोणत्याही परिस्थितीत आनंदी आणि स्थिर जीवन जगू शकतो.ʼʼ