मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामांतर ‘नाना शंकरशेठ’ असे करण्याचा प्रस्ताव लवकरात लवकर संमत करावा ! – खासदार अरविंद सावंत, शिवसेना

मुंबई – मुंबईच्या विकासात नाना शंकरशेठ यांचे मोलाचे योगदान आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसला ‘नाना शंकरशेठ’ यांचे नाव देण्याची मागणी फार जुनी आहे. राज्यशासनाने आधीच हा प्रस्ताव संमत केला आहे. या प्रस्तावाला विलंब झाला आहे. त्यामुळे केंद्रशासनाकडून याला कोणताही विलंब व्हायला नको. केंद्रशासनाने लवकरात लवकर हा प्रस्ताव संमत करावा, असे आवाहन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केले आहे.

याविषयी खासदार अरविंद सावंत म्हणाले, ‘‘याविषयी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी याविषयी ‘विचार चालू आहे. लवकरच संबंधित विभाग याविषयी निर्णय घेणार आहेत’, असे सांगितले आहे.’’ मुंबई नगरीच्या औद्योगिक आणि सामाजिक पायाभरणीत जगन्नाथ शंकरशेठ (नाना शंकरशेठ) यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळेच मुंबई सेंट्रल टर्मिनसला ‘नाना शंकरशेठ सेंट्रल टर्मिनस’ असे नाव द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली होती. महाविकास आघाडी शासनाने नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव हा विधिमंडळातही संमत केला आहे. राज्यशासनाकडून केंद्रशासनाकडेही हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.