बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणी ८ वर्षे कारागृहात राहिल्यावर तरुण निर्दोष

मणिपूर सरकार नोकरी आणि घर देणार

  • ‘विलंबाने मिळणारा न्याय हा अन्यायच आहे’, असेच जनतेला वाटते. त्यामुळे मणिपूर सरकारने निरपराध्याला ८ वर्षे नाहक कारागृहात राहिल्याच्या प्रकरणी उत्तरदारयींचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षाही केली पाहिजे, असे जनतेला वाटते !
  • देशातील अनेक प्रकरणांत असे घडत असते. सनातनच्याही काही निरपराध  साधकांना अशा प्रकारे आयुष्यातील महत्त्वाची काही वर्षे कारागृहात राहिल्यावर त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले; मात्र त्यांना कुठल्याही सरकारने हानी भरपाई दिली नाही, हे लक्षात घ्या !
  • निरपराध्यांना अटक करून त्यांना कारागृहात डांबल्यानंतर त्यांची निर्दोष मुक्तता होते; मात्र खरे आरोपी कधीच पकडले जात नाहीत, हे पोलिसांना लज्जास्पद !
मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह

इंफाळ (मणिपूर) – वर्ष २०१३ मध्ये समवेत काम करणार्‍या तरुणीवर बलात्कार करून हत्या करण्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तौदम जिबल सिंह या तरुणाची ८ वर्षांनंतर निर्दोष सुटका करण्यात आली आहे. स्थानिक न्यायालयामध्ये न्याय मिळण्यास विलंब झाल्याने या तरुणाला केवळ आरोपांमुळे ८ वर्षे कारागृहात काढावी लागली. यामुळे आता मणिपूरचे मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांनी या तरुणाला सरकारी नोकरी आणि घर देण्याची घोषणा केली आहे. बलात्काराच्या आरोपानंतर जमावाने या तरुणाच्या घराला आगही लावली होती.

१. मुख्यमंत्री सिंह यांनी म्हटले की, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये विलंब झाल्याने त्याच्या आयुष्यातील महत्त्वाची ८ वर्षे कारागृहामध्येच गेली. एवढ्या कालावधीमध्ये त्याला काहीतरी छान करता आले असते. त्याने स्वत:च्या कुटुंबाचे दायित्वही स्वतःच्या खांद्यावर घेतले असते. आम्ही दिलेला हा प्रस्ताव तो मान्य करील, अशी मला आशा आहे. ही नोकरी स्वीकारून तो त्याचे पुढील आयुष्य चांगल्या पद्धतीने जगेल, असा मला विश्‍वास आहे.

२. मुख्यमंत्र्यांनी तौदम याची भेट घेतली. सरकारी नोकरी देण्यासह तौदमच्या कुटुंबासाठी नवीन घर बांधून देण्याचे आश्‍वसनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तौदमला वन विभागामध्ये नोकरी दिली जाणार आहे. तौदमचे वडील वन विभागामध्येच कामाला होते.