एस्.टी. महामंडळाला सातत्याने होत असलेल्या तोट्यामागे कुणाचे आर्थिक लागेबांधे आहेत का ?, याची शासनाने चौकशी करावी. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यय करून केवळ अडीच वर्षांत ही सेवा बंद करण्याची वेळ का आली ? याचे चिंतनही एस्.टी. महामंडळाने करावे.
मुंबई – भाडेतत्त्वावर असलेली राज्य परिवहन मंडळाची ‘शिवशाही’ वातानुकूलित शयनयान सेवा बंद करण्यात आली आहे. या सेवेतून काही आस्थापनांनी घेतलेली माघार, तसेच प्रवाशांचा अल्प प्रतिसाद यांमुळे ही सेवा बंद करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून घोषित करण्यात आले आहे.
ऑगस्ट २०१८ मध्ये शिवशाही शयनयान वातानुकूलित बस सेवा परिवहन विभागाकडून चालू करण्यात आली होती. खासगी वाहनांकडे वळणारे नागरिक एस्.टी. महामंडळाकडे यावेत, यासाठी ही सेवा चालू करण्यात आली होती; मात्र खासगी वाहनांपेक्षा प्रवास भाडे अधिक असल्यामुळे या सेवेला अल्प प्रतिसाद लाभत होता. फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रवास भाड्याचा दर अल्प करण्यात आला; मात्र तरीही प्रवाशांचे भारमान सरासरी केवळ ३५-४० टक्के इतकेच राहिले. महामंडळाच्या अटी, आर्थिक हानी यांमुळे यांतील काही आस्थापनांनी माघार घेतली. त्यात दळणवळण बंदीच्या कालावधीत ही सेवा अधिक काळ बंद होती. या सर्वांचा फटका ‘शिवशाही’ वातानुकूलित शयनयान सेवेला बसला.