हिंदूंच्या संघटित प्रयत्नांनंतर पोलिसांकडून तक्रार प्रविष्ट
हिंदु धर्मावर आघात झाल्यावर न्याय मिळण्यासाठी हिंदूंना संघटितपणे प्रयत्न करावे लागतात, हे संतापजनक ! हिंदूंच्या मागण्यांकडे डोळेझाक करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? अशा पोलिसांवर कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !
वास्को, ४ जानेवारी (वार्ता.) – येथील गोवा शिपयार्ड आस्थापनाच्या समोरील श्री साई मंदिरात उत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात आलेली कमान २ जानेवारी या दिवशी रात्री ११ वाजता अल्पसंख्य समाजातील एका व्यक्तीने तोडल्याने येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मंदिराच्या व्यवस्थापक मंडळाने २ जानेवारी या दिवशी रात्री वास्को पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली, तसेच ३ जानेवारी या दिवशी सकाळी मंदिराचे व्यवस्थापक मंडळ आणि स्थानिक साईभक्त यांनी पोलीस ठाणे गाठून संशयित अल्पसंख्य व्यक्तीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्याची मागणी केली. ‘जोपर्यंत तक्रार नोंदवली जाणार नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून बाहेर जाणार नाही’, असा पवित्रा साईभक्तांनी घेतल्यानंतर पोलिसांनी शेवटी ३ जानेवारी या दिवशी रात्री या घटनेला अनुसरून तक्रार प्रविष्ट करून घेतली.
तक्रार नोंदवण्यास पोलिसांकडून टाळाटाळ !
मंदिरातील उत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात आलेली कमान २ जानेवारी या दिवशी रात्री ११ वाजता अल्पसंख्य समाजातील एका व्यक्तीने मोडून टाकली. ही घटना लक्षात आल्यावर मंदिराच्या व्यवस्थापक मंडळाने रात्री त्वरित वास्को पोलीस ठाणे गाठून घटनेला अनुसरून तक्रार प्रविष्ट करण्याची पोलिसांकडे मागणी केली; मात्र पोलिसांनी पहाटे ४ वाजेपर्यंत संशयित अल्पसंख्य व्यक्तीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली नाही. यानंतर ३ जानेवारी या दिवशी सकाळी ८ वाजता मंदिराचे व्यवस्थापक मंडळ आणि स्थानिक साईभक्त यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात एकत्र येऊन संबंधित अल्पसंख्य व्यक्तीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्याची मागणी केली; मात्र तरीही पोलिसांनी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तक्रार प्रविष्ट केली नाही.
पोलिसांच्या भूमिकेचा निषेध !
पोलिसांच्या या भूमिकेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. यानंतर साईभक्तांनी ‘जोपर्यंत तक्रार नोंदवली जाणार नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून निघणार नाही’, असा पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांना संबंधित अल्पसंख्य व्यक्तीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करणे भाग पडले. पोलिसांनी तक्रार प्रविष्ट केल्यानंतर साईभक्तांनी साईबाबांच्या नामघोषाने पोलीस ठाणे परिसर दणाणून सोडला.
‘गोवा लोकायुक्ता’कडे तक्रार करणार !
पोलिसांनी तक्रार प्रविष्ट करण्यास विलंब केल्याने स्थानिक भक्तगणांनी वास्को पोलिसांच्या विरोधात ‘गोवा लोकायुक्त’ यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदूंवरील अन्याय सहन करणार नाही ! – नितीन देसाई, युवा प्रदेशाध्यक्ष, ‘गोवा सुरक्षा मंच’
‘गोवा सरकार अल्पसंख्यांकांचे आवश्यकतेपेक्षा अधिक लाड करत आहे. हिंदूंवरील अन्याय आता आम्ही सहन करणार नाही’, असे मत ‘गोवा सुरक्षा मंच’चे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन देसाई यांनी या वेळी व्यक्त केले.