गोवामुक्ती लढ्यात सीमावर्ती भागाची निर्णायक भूमिका ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

गोवा मुक्ती लढ्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या दोडामार्ग येथील स्वातंत्र्यसैनिकांचा ‘भारत माता की जय’ या संघटनेच्या वतीने मरणोत्तर सन्मान

प्रा. सुभाष वेलिंगकर (संग्रहित छायाचित्र)

दोडामार्ग, ३ जानेवारी (वार्ता.) – गोवामुक्ती लढ्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या दोडामार्ग येथील स्वातंत्र्यसैनिकांची गोवा शासन दरबारी नोंद होण्यासाठी ‘भारतमाता की जय’ ही संघटना सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. तसेच दोडामार्ग (महाराष्ट्र)-गोवा हद्दीवर या स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची आठवण करून देणारे कृतज्ञता स्मारक उभारण्यासाठीही संघटना गोवा सरकारचा पाठपुरावा घेणार आहे, असे प्रतिपादन ‘भारतमाता की जय’ या संघटनेचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले.

‘भारतमाता की जय’ या संघटनेने गोवामुक्ती लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा मरणोत्तर सन्मान करण्यासाठी १ जानेवारी या दिवशी येथील महाराजा सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रा. सुभाष वेलिंगकर बोलत होते. या वेळी व्यासपिठावर गोव्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, सूर्यकांत परमेकर, ‘भारतमाता’ संघटनेचे गोवा राज्य कार्यवाह प्रकाश नेसवणकर, मयूर दळवी आदींची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात दोडामार्ग शहरातील तब्बल १२ स्वातंत्र्यसैनिकांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना श्रीफळ, भारतमातेची प्रतिमा आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी आनंद कामत, रजत राणे, सूर्यकांत परमेकर, सुहास परब आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनल गवस आणि शुभांगी गावडे, प्रास्ताविक गणेश गावडे आणि आभार वैभव रेडकर यांनी मानले.