मुंबई – राज्य सरकारने कोरोनाच्या लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरवला आहे. पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखाने यांतील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारी कामगार, एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश आहे. कोरोना लसीकरणासाठी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या पहिल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला आहे.
१. आरोग्य कर्मचार्यांच्या लसीकरणासाठी ९ गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे. दुसर्या गटात पहिल्या फळीतील कर्मचार्यांचा समावेश असून यात राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांच्या कर्मचार्यांसह आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक आणि महानगरपालिका कर्मचारी यांचा समावेश आहे.
२. तिसर्या गटात ५० वर्षांवरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत, अशा ५० वर्षांखालील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
३. आरोग्य कर्मचार्यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून एका ठिकाणी १०० जणांना लस दिली जाईल. अन्य कर्मचार्यांच्या लसीकरणासाठी शासकीय अथवा खासगी रुग्णालये, शाळा, समाजमंदिर आदी ठिकाणी, तर तिसर्या गटातील व्यक्तींना लसीकरणासाठी दवाखाने, शाळा, समाजमंदिर, ग्रामपंचायत, नगरपालिका अशा ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
४. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी राज्य शासनाने सिद्धता केली असून आतापर्यंत शासकीय आरोग्य संस्थेतील ९९ टक्के,तर खासगी आरोग्य संस्थेतील ७८ टक्के कर्मचार्यांची माहिती पूर्ण करण्यात आली आहे.
५. लस टोचण्यासाठी १६ सहस्र २४५ कर्मचार्यांची को-विन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंत को-विन पोर्टलवर ९० सहस्रांहून अधिक लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. २ लाख ६० सहस्र शासकीय आरोग्य कर्मचार्यांना लसीकरण करण्यात येणार आहे.
६. लसीकरण पथकामध्ये पाच सदस्यांचा समावेश असणार आहे.राज्यस्तरीय १, विभागीय स्तरावर ९, जिल्हा स्तरावर ३४, महामंडळांचे २७ असे शीतगृह सिद्ध असून ३ सहस्र १३५ साखळी केंद्रे उपलब्ध आहेत.
७. कोरोनाच्या लसीकरण मोहिमेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत आहे. निवडणूक मतदान प्रक्रियेच्या धर्तीवर लसीकरण मोहिमेची कार्यवाही केली जाणार आहे.
८. मतदानासाठी ज्याप्रकारे बूथ असतो, तसे बुथ लसीकरणासाठी करण्यात येणार आहेत. लसीकरणाच्या यादीत नाव असलेल्या आरोग्य कर्मचार्याला त्या बूथमध्ये ओळखपत्र पडताळून प्रवेश दिला जाईल. लसीकरणानंतर त्या व्यक्तीच्या भ्रमणभाषवर संदेश येईल आणि क्यूआर् कोड असलेले प्रमाणपत्रही पाठवण्यात येणार आहे.