‘ए.के. व्हर्सेस ए.के.’ या चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मधील आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची भारतीय हवाई दलाची मागणी

हवाई दलाच्या गणवेशातील अभिनेत्याच्या तोंडी अर्वाच्च भाषा दाखवून प्रतिमा मलीन करण्यात आल्याचा ठपका

आक्षेपार्ह दृश्ये प्रसारित करून चित्रपटाला प्रसिद्धी मिळवून द्यायची, असा नवा फंडा निर्माण झाला आहे. सातत्याने होणारे हे प्रकार लक्षात घेऊन असे प्रकार रोखण्यासाठी शासनाने ठोस धोरण निश्‍चित करणे आवश्यक आहे.

मुंबई – चित्रपट निर्माता अनुराग कश्यप यांचा ‘ए.के. व्हर्सेस ए.के.’ या चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मधील काही दृश्यांवर भारतीय हवाई दलाने आक्षेप घेतला असून ही दृश्ये हटवण्याची सूचना ‘नेटफिक्स’ला केली आहे. या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ नुकताच प्रसारित करण्यात आला असून चित्रपट २४ डिसेंबर या दिवशी ‘नेटफिक्स’वर प्रसारित करण्यात येणार आहे.

‘ट्रेलर’ मध्ये अनिल कपूर भारतीय हवाई दलाच्या गणवेशात दाखवण्यात आला असून त्यांच्या तोंडी अश्‍लील शिव्या आणि अर्वाच्च भाषा दाखवण्यात आली आहे. असे वागणे हवाई दलाच्या नियमांत बसत नसून हवाई दलाची प्रतिमा मलीन करणारे असल्याचे भारतीय हवाई दलाकडून ‘नेटफिक्स’ला सांगण्यात आले आहे.