१. ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने गुरुकृपेचे महत्त्व
‘मी दुरून पाहिल्यावर ध्येय मला फार दूर वाटत होते. पुढे मला साधना समजल्यावर ‘गुरुदेवांनी माझा हात पकडला आहे’, हे माझ्या लक्षात आले. त्या वेळी ‘ध्येय कितीही दूर असले, तरी ते गाठणे अशक्य नाही’, याची मला जाणीव झाली.
२. संघर्षाला सामोरे जाण्याचे महत्त्व
संत मीराबाईंनी संघर्षातूनच श्रीकृष्णाला प्राप्त केले. भक्त प्रल्हादाला संघर्षातूनच नृसिंहाचे दर्शन झाले. संघर्षानंतरच भगवंत स्वतः संत तुकाराम महाराजांना न्यायला आला. संघर्षातूनच असे मोठे-मोठे संत झाले. या सर्व संतांच्या संघर्षासमोर आपला संघर्ष काहीच नाही !
३. गुरुप्राप्तीचे महत्त्व
‘मनुष्यजन्म मिळणे जेवढे भाग्याचे आहे, त्यापेक्षाही ‘गुरुदेव आपल्या जीवनात येणे’, हे अधिक सौभाग्यपूर्ण आहे.
४. दास्यभावाचे महत्त्व
अ. ‘मी साधक नाही किंवा सेवकही नाही, तर मी गुरुदेवांच्या चरणांचा ‘दास’ आहे.
आ. गुरुदेव दासामध्येच ‘ईश्वरप्राप्तीचा ध्यास’ निर्माण करतात.
५. अंतःकरणशुद्धीचे महत्त्व
हृदयात (अंतःकरणात) गुरुदेवांना विराजमान करायचे असेल, तर हृदयाची स्वच्छता करणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे अनिवार्य आहे. नंतर भक्तीभावाच्या माध्यमातून अंतःकरणाची शुद्धी केल्यानंतरच गुरुदेव साधकाच्या हृदयरूपी मनमंदिरात विराजमान होतात.’
६. ईश्वरप्राप्तीच्या दृष्टीने तळमळीचे महत्त्व
फुलझाडांवर पुष्कळ फुले उमलतात; परंतु ज्यांच्यामध्ये ईश्वरप्राप्तीची तळमळ असते, तीच फुले भगवंताच्या चरणी समर्पित होतात.’
– श्री. चेतन हरिहर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (एप्रिल २०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |