राहुल गांधी यांना समजून घेण्यास शरद पवार न्यून पडले ! – बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

बाळासाहेब थोरात

मुंबई – शरद पवार यांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो; मात्र ‘ते राहुल गांधी यांना समजून घेण्यात न्यून पडलो’, असे वाटते, असे मत काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी ‘राहुल गांधी यांच्यामध्ये थोडेसे सातत्य अल्प आहे’, असे विधान केले होते. त्यावर काँग्रेसच्या नेत्या आणि महिला अन् बाल विकासमंत्री अधिवक्ता यशोमती ठाकूर यांनी ‘सरकार स्थिर ठेवायचे असेल, तर काँग्रेसच्या नेतृत्वावर बोलणे टाळावे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ‘शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. काँग्रेसने त्यांच्या सूचना स्वीकाराव्यात’, असा सल्ला दिला होता.


यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांना पक्षात स्वीकारार्हता असून ते आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील काँग्रेस पुन्हा संघटित होत आहे. त्यांनी जीवनात जे दुःख पाहिले, त्यांच्यावर जे आघात झाले, त्यातूनही उभे राहून ते नेतृत्व करत आहेत. ते करत असलेल्या कामाच्या विरोधात भाजपच्या प्रचारयंत्रणा काम करतात. पुढील काळात ते समर्थपणे नेतृत्व करणार आहेत. त्यांची पुढची वाटचाल यशस्वी असेल, यावर आमचा विश्‍वास आहे.’’