प्रणिता (आताची सौ. वेदश्री खानविलकर) आमची मोठी मुलगी आहे. ती शांत, संयमी आणि तत्त्वनिष्ठ आहे. तिच्यामुळे ‘आम्हाला मुलगा नाही’, याची जाणीव कधीच झाली नाही. ती मागील ५ वर्षांपासून सनातनच्या रामनाथी आश्रमात सेवा करत आहे. त्यामुळे गुरुकृपेनेच तिच्यावर चांगले संस्कार झाले आहेत. सौ. वेदश्री आणि श्री. हर्षद खानविलकर यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिची अन् श्री. हर्षद यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
१. सासरच्या मंडळींशी अल्प कालावधीत जुळवून घेणारी सौ. वेदश्री हर्षद खानविलकर !
१ अ. वडील रुग्णाईत असतांना त्यांची सर्व कामे दायित्व घेऊन करणे : आम्ही मुंबईत असतांना मी रुग्णाईत असल्याने ‘बॉम्बे हॉस्पिटल’मध्ये भरती झालो होतो. तेव्हा औषधे आणणे, आधुनिक वैद्यांशी बोलणे, माझ्या कार्यालयात जाऊन माझ्या सुटीविषयी आणि ‘मेडिक्लेम’विषयी बोलणे, ही सर्व कामे ती दायित्व घेऊन करत होती. एखादा विषय तिला नवा असेल किंवा तिला काही ठाऊक नसेल, तरी ती त्या विषयाची माहिती करून घ्यायची.
१ आ. साधनेत साहाय्य करणे : ती माझ्यावर जिवापाड प्रेम करते आणि माझी काळजी घेते. माझ्या साधनेची काळजी माझ्यापेक्षा तिलाच अधिक आहे. कधी कधी माझ्या मनातील नकारात्मक विचार वाढले, तर मी तिला सांगतो. तेव्हा ती मला त्यावर उपाय सांगून सकारात्मक रहाण्यास सांगते. ती मला साधनेचे योग्य दृष्टीकोन देते.
१ इ. काटकसरी वृत्ती : मागील वर्षी तिच्या लग्नाच्या वेळी लग्नाचे कपडे, दागिने आदी खरेदी करतांना तिने कसलाही हट्ट केला नाही. ती नेहमी अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करते.
१ ई. स्थिर आणि आनंदी : लग्नानंतर १ मासातच श्री. हर्षद जालना येथे प्रसार सेवेला गेले. कोरानामुळे झालेल्या दळणवळण बंदीमुळे ते ७ – ८ मासांनीच परत आले. त्या वेळीही प्रणिता एकदम स्थिर आणि आनंदी होती.
१ उ. सासू-सासर्यांची काळजी घेणे : प्रणिताच्या सासरची मंडळी सनातनच्या परिवारातील आहेत. तिने सासरच्या मंडळींशी अल्प कालावधीत जुळवून घेतले. ती आमच्याप्रमाणे सासू-सासर्यांचीही काळजी घेते. रामनाथी आश्रमात आल्यावर तिच्या सासर्यांची प्रकृती ठीक नव्हती. तेव्हा ती त्यांच्यासाठी सकाळी उठून झाडपाल्याचे औषध बनवून देत असे.
२. शांत, प्रेमळ, मनमिळाऊ आणि सेवेला तत्पर असणारे श्री. हर्षद उदय खानविलकर !
२ अ. शांत, प्रेमळ आणि काटकसरी वृत्ती : श्री. हर्षद खानविलकर (जावई) नेहमी सकारात्मक असतात. ते स्वभावाने शांत, प्रेमळ आणि मनमिळाऊ आहेत. मी त्यांना सहसा कधी रागावलेले पाहिले नाही. ते काटकसरी आहेत. ते कधी अनावश्यक खर्च करत नाहीत. ते उत्तम स्वयंपाक करतात. त्यांना दुसर्यांना पदार्थ करून खायला घालायला पुष्कळ आवडते.
२ आ. सेवेची तळमळ : अकस्मात एखादी सेवा आली, तरी हर्षद ती सेवा तत्परतेने करतात. ते मायेचे पाश तोडून प्रसारातील सेवेला जायला सिद्ध असतात.
२ इ. अनुसंधानात असणे : लग्नविधी चालू असतांनाही प्रणिता आणि हर्षद परात्पर गुरु डॉक्टरांच्या अनुसंधानात सतत असल्याचे जाणवत होते. त्यामुळे ते दोघेही सतत आनंदी दिसत होते.
३. अनुभूती
अ. लग्नाच्या दिवशी वधू-वरांना पाहून काही नातेवाईकांना ‘हा श्रीलक्ष्मीनारायणा’चा जोडा आहे’, असे जाणवले. मी नवरदेवाची पाद्यपूजा करत असतांना मला ‘साक्षात श्रीमन्नारायणाची पाद्यपूजा करत आहे’, असे जाणवले.
आ. पुरोहितांनी सर्व विधी भावपूर्ण केले. हे लग्न साक्षात वैकुंठनगरीत, म्हणजेच रामनाथी आश्रमात झाल्यामुळे ‘साक्षात देवता उपस्थित होत्या’, असे मला जाणवले. वधू-वरांना आशीर्वाद देण्यास संतांच्या रूपाने देवता उपस्थित होत्या. श्री. वझेगुरुजी यांनी भावपूर्ण मंगलाष्टके म्हटली. त्या वेळी सर्वांची भावजागृती झाली.
‘हे गुरुदेवा, तुम्हीच आम्हाला प्रणिता (सौ. वेदश्री) आणि श्री. हर्षद यांच्या माध्यमातून गुणवंत लेक अन् जावई दिले, यासाठी आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. दिलीप नलावडे (सौ. वेदश्री हिचे वडील), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.११.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |