चि. मयूर फडके आणि चि.सौ.कां. भावना देसाई यांच्या लग्नाची गाठ । उभयतांनी चालावी गुरुकृपायोगाच्या माध्यमातून मोक्षाची वाट !

७.१२.२०२० या दिवशी प्रसारात सेवा करणारे सातारा येथील चि. मयूर माधव फडके आणि रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या चि.सौ.कां. भावना श्रीराम देसाई यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्त तिच्या आईला आणि अंबरनाथ येथील साधकांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. मयूर फडके आणि चि.सौ.कां. भावना देसाई यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

उखाणे

वधू आणि वर या दोघांसाठी उपयोगी पडतील असे उखाणे

श्रीकृष्ण अवतार झाला धर्म संस्थापनेसाठी ।
……. रावांचे नाव घेते आपल्या सर्वांसाठी ॥

यमुनेच्या तिरावर कृष्ण वाजवी बासरी ।
….सह साधना करतो,  गुरुकृपा असावी आम्हावरी ॥

– सौ. शकुंतला बद्दी, खारघर, नवी मुंबई.

साधी रहाणी आणि समंजस वृत्तीचे चि. मयूर माधव फडके !

चि. मयूर फडके

१. साधी रहाणी

‘श्री. मयूर यांचे रहाणीमान पुष्कळ साधे आहे. समाजातील मुलांपेक्षा त्यांचे वेगळेपण लक्षात येते. त्यांच्याशी भावनाचा विवाह ठरल्यापासून त्यांचे बोलणे आणि वागणे यांतून त्यांच्यातील साधकत्व जाणवते.

२. स्पष्टवक्तेपणा

‘नातेवाइकांनी त्यांना विवाहानंतर आर्थिक दायित्व कसे निभावणार ?’, असे विचारल्यावर श्री. मयूर यांनी नातेवाइकांना स्पष्टपणे त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे दिली .

३. प्रांजळ 

अ. नातेवाइकांशी रागाने बोलले गेल्याचे त्यांच्या लगेच लक्षात आले. त्यांनी नातेवाइकांची क्षमा मागितली. नंतर त्यांनी मला ‘कुठे चुकले ? अजून कसे असायला हवे ?’, असे विचारून घेतले. तेव्हा त्यांच्यातील शिकण्याची आणि स्वीकारण्याची वृत्ती दिसून आली.

आ. माझ्याशी आणि भावनाशी बोलतांना काही अयोग्य बोलले गेल्याचे त्यांना जाणवल्यावर त्यांनी मनापासून आम्हा दोघींची क्षमा मागितली. तेव्हा त्यांच्या बोलण्यातील निरागसता आणि चूक झाल्याविषयीची खंत प्रकर्षाने जाणवली.

४. समंजस

एकदा भावनाकडून अयोग्य पद्धतीने बोलले गेल्यावर श्री. मयूर यांनी तिला शांतपणे आणि प्रेमाने त्याची जाणीव करून दिली अन् ‘पुढे कशी काळजी घ्यायला हवी ? स्वभावात तिने काय पालट करणे अपेक्षित आहे ?’, हे समजावून सांगितले. भावना मला म्हणाली, ‘‘आई, तेव्हा मला तुझी आठवण आली. तू जसे मला समजावतेस, त्याप्रमाणेच श्री. मयूर यांनी मला समजावून सांगितले.’’ ‘भावना लहान आहे’, हे लक्षात घेऊन श्री. मयूर तिला समजून घेतात.

‘हे श्रीकृष्णा, तुझ्या कृपेमुळेच मला श्री. मयूर यांची गुणवैशिष्ट्येे लक्षात आली. ‘भावनाच्या जीवनातील माझी जागा ते समर्थपणे घेऊ शकतात’, याची मला आता निश्‍चिती वाटते. ‘देवाने मला श्री. मयूर यांच्या रूपात पुत्र दिला’, त्याविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटते. देवा, खर्‍या अर्थाने एका मोठ्या दायित्वातून मला मोकळे केलेस. त्याविषयी श्रीमन्नारायणाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. वैशाली श्रीराम देसाई (श्री. मयूरयांच्या सासूबाई), अंबरनाथ, ठाणे. (१८.२.२०२०)


आनंदी आणि इतरांना साहाय्य करणारे चि. मयूर माधव फडके !

१. ‘मयूर सतत आनंदी आणि हसतमुख असतो.’

– श्री. आणि सौ. माधुरी दीक्षित, सातारा

२. साधकांप्रती आदर

‘मयूरच्या घरी गेल्यावर तो आम्हाला आदराने बसायला सांगतो. तो घरी आलेल्यांचे प्रेमाने आणि हसतमुखाने स्वागत करतो.’

– सौ. नावडकर आणि श्रीमती वाघ, सातारा

३. सहजता

अ. ‘त्याला कोणतीही सेवा मिळाली की, तो ती सेवा नीट समजून घेऊन पूर्ण करतो. तो मनातील लगेच बोलून घेतो.’ – श्री. आणि सौ. माधुरी दीक्षित, सातारा

आ. ‘एकदा आम्ही श्री. मयूर यांच्या सेवेचे नियोजन करण्यासाठी बसलो होतो. तेव्हा आमची पहिलीच भेट असूनही ते सहजतेने आणि आधीची ओळख असल्यासारखे बोलत होते. त्यांनी त्यांच्या सेवेतील आणि साधनेतील अडचणी मोकळेपणाने सांगितल्या.’

– सौ. वेदिका पालन, गोवा

४. इतरांना साहाय्य करणे

अ. ‘एकदा आम्हाला गुरुपौर्णिमेची सेवा करून घरी यायला रात्रीचे १२ वाजले. तेव्हा कुठलाही विचार मनात न आणता त्याने आम्हाला गाडीतून घरी पोचवले.

आ. एकदा मी रुग्णाइत असतांना तो कामात व्यस्त असूनही रात्री १० वाजता माझी विचारपूस करायला घरी आला.’

– सौ. कमल कदम, सातारा

५. निरपेक्ष वृत्ती

‘त्याने निरपेक्षपणे स्वतःची गाडी सेवेसाठी एक वर्षभर वापरायला दिली.’ – श्री. महेश गायकवाड, सातारा

६. स्वीकारण्याची वृत्ती

‘गोडोली येथे आम्ही (मी आणि मयूरची आई) समवेत सेवा करायचो. तेव्हा मयूर पाचवीत शिकत होता. आई सेवेसाठी दिवसभर बाहेर असली, तरी तो तक्रार करत नसे. आईने समजावून सांगितल्यावर तो आनंदाने स्वीकारायचा.’ – सौ. कमल कदम

७. साधनेचे गांभीर्य 

अ. ‘सातारा येथे असतांना मयूर नित्यनेमाने पूजाअर्चा, नामजप इत्यादी पूर्ण करूनच सेवेसाठी बाहेर पडत असे.

आ. ‘मी इतकी वर्षे साधनेत आहे, तरी प्रगती होत नाही’, याविषयीची खंत तो नेहमीच माझ्याकडे बोलून दाखवत असे. तो मला साधनेतील जवळचा मित्रच वाटतो.

इ. तो प्रत्येक सेवा तळमळीने साधकांना समवेत घेऊन पूर्ण करतो.’

– श्री. राहुल भरमगुंडे, सातारा

८. ‘त्याची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे.’

– श्री. महेश गायकवाड


समंजस आणि साधनेच्या स्तरावर विचार करणार्‍या चि.सौ.कां. भावना श्रीराम देसाई !

चि.सौ.कां. भावना देसाई

१. समंजस

‘मी नोकरी करत असल्याने तिला वेळ देऊ शकत नव्हते. ती आजीकडे आनंदाने रहायची. तिने ‘एखादी वस्तू हवी’, असा कधी हट्ट केला नाही. तिला एखादी वस्तू आवडल्यास ती तसे सांगत असे. तेव्हा ‘आपण नंतर घेऊ. आता आवश्यकता नाही’, असे तिला सांगितल्यावर ती लगेच ऐकत असे.

२. साधनेच्या स्तरावर प्रसंगाला सामोरे जाणे

एप्रिल २०१९ मध्ये ती घरी आली असतांना तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘नातेवाईक तिला प्रश्‍न विचारणार’, हे लक्षात आल्यावर तिने दहा देवदूतांचे साहाय्य घेऊन ‘त्या प्रसंगाला कसे सामोरे जायचे ?’, ते लिहून काढले. (ठाणे जिल्ह्यातील संतांनी एका सत्संगात दहा देवदूतांचे साहाय्य घेऊन ‘भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा कशी करायची ?’, हे शिकवले होते. मी त्याविषयी भावनाला सांगितले होते.) तिने त्या प्रसंगाला शांतपणे आणि धैर्याने तोंड दिले

३. स्वीकारण्याची वृत्ती

पूर्वी तिला तिच्यातील स्वभावदोषांची जाणीव करून दिल्यावर तिच्याकडून स्वीकारले जात नसे. आता ती स्वतःहून विचारते, ‘‘मी अजून काय पालट करू ? माझ्यातील कोणत्या अहंच्या पैलूवर प्रक्रिया करू ?’’

४. आध्यात्मिक मैत्रीण

आम्हा दोघींतील आध्यात्मिक मैत्रीचे नाते हळूहळू वृद्धींगत होत गेले. आमच्या बोलण्यात ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया कशी चालू आहे ? नवीन काय शिकायला मिळाले ? कोणते स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू यांवर स्वयंसूचना घेत आहे ? कोणत्या प्रसंगावर मात करता आली किंवा नाही, संतांच्या सत्संगात काय शिकायला मिळाले ?’, असेच विषय असतात. माझे काही चुकल्यास ती मला तत्त्वनिष्ठतेने सांगते.

५. पालटण्याची तीव्र तळमळ

भावनाचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने पूर्णवेळ साधना करण्याची इच्छा व्यक्त केली. कुटुंबियांचा त्यासाठी विरोध असल्याने मला थोडे दडपण आले होते; पण देवाच्या कृपेने प्रतिकूल प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ मिळाले आणि भावनानेही देवाने दिलेल्या संधीचे सार्थक करण्याचा चिकाटीने प्रयत्न केला. आरंभी तिला आश्रमजीवनाशी जुळवून घेणे कठीण जात होते. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करतांना तिच्या मनाचा पुष्कळ संघर्ष व्हायचा. तेव्हा मी तिला सांगितले, ‘‘तुला आश्रमजीवन स्वीकारणे अशक्य वाटत असेल, तर तू परत घरी येऊ शकतेस; पण ‘देवाने तुला साधनेची छान संधी दिली आहे. त्याचा लाभ करून घ्यायला हवा’, असे वाटते.’’

तिने त्यानंतर कधीच तक्रार केली नाही. तिच्याकडून चुका झाल्यवर त्या स्वीकारता येण्यासाठी तिने तळमळीने प्रयत्न केले. एका सत्संगात संत मला म्हणाले, ‘‘भावनाकडून दृष्टीकोन घेत जा.’’ जिल्ह्यातील संतांनीही मला सांगितले, ‘‘आता तुम्ही भावनाकडून शिका.’’ तेव्हा मला कृतकृत्य झाल्यासारखे वाटून माझे मन कृतज्ञतेने भरून आले. भावनाने देवाने दिलेल्या संधीचे सार्थक केले.

‘हे श्रीकृष्णा, साधनेची ओढ असलेली मुलगी मला दिलीस,’ त्याविषयी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. वैशाली श्रीराम देसाई (आई), अंबरनाथ, ठाणे. (१८.२.२०२०)

६. प्रेमभाव

‘भावना ही माझ्या मुलीची (मानसीची) बालपणीची मैत्रीण आहे. ती शांत आणि संयमी आहे. ती अभ्यासाच्या निमित्ताने आमच्या घरी यायची. तेव्हा ती सगळ्यांची प्रेमाने विचारपूस करायची.

७. आईला साहाय्य करणे

भावनाची आई सेवेसाठी बाहेर गेल्यावर भावना घरातील स्वयंपाक करणे, आवरणे या सेवा पूर्ण करायची. ती आश्रमात गेल्यावर घरातील अडचणीमुळे तिला भ्रमणभाष देता आला नाही, तरी ती शांत राहिली आणि संयमाने वागली.

८. समष्टी सेवेची आवड

तिला समष्टी सेवा करण्याची आवड आहे. माझ्याकडे केंद्रातील ग्रंथांचे दायित्व असल्याने मी ग्रंथसाठा काढत असतांना ती स्वतःहून मला सेवेत साहाय्य करत असे. ती ग्रंथप्रदर्शनाच्या दिवशी साहित्य ने-आण करणे आणि प्रदर्शन लावायला साहाय्य करणे, या सेवा आनंदाने करायची.

९. मैत्रिणीला आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणे

मानसी आणि भावना या दोघी बालमैत्रिणी एकाच वेळी पूर्णवेळ साधिका झाल्या. त्या आध्यत्मिक मैत्रिणी असून त्या अडचणीत एकमेकींना आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करतात.

‘देवा, तूच माझ्याकडून ही सूत्रे लिहून घेतलीस’, त्याविषयी मी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. वर्षा अग्निहोत्री, अंबरनाथ, ठाणे. (१८.२.२०२० )

१०. चुकांविषयी संवेदनशील

‘ती इयत्ता दहावीत असल्यापासून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चांगली राबवते. ती स्वतःच्या चुका सांगते आणि तत्त्वनिष्ठ राहून इतरांना साहाय्य करते.

११. कलेची आवड

तिचा आवाज चांगला आहे. तिने तिच्या मैत्रीणीच्या (मानसीच्या) वाढदिवसानिमित्त भावपूर्ण गीत गायले होते. ती कविता करते.

१२. आर्थिक स्थिती नाजूक असूनही नोकरी करण्याऐवजी पूर्णवेळ साधना करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेणे

भावनाच्या कुटुंबातील आर्थिक स्थिती नाजूक आहे. या स्थितीत नोकरी करून कुटुंबाला अर्थसाहाय्य करण्याऐवजी ती पूर्णवेळ साधिका झाली. ही तिच्यावर असलेली देवाची कृपाच आहे. नोकरी करून स्वतःच्या आवडी-निवडी पूर्ण करण्यापेक्षा तिने भगवंतप्राप्तीसाठी त्याग करून पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. हे अतिशय कौतुकास्पद आहे .

१३. ‘गुरुकृपेने तीव्र प्रारब्धावर मात करता येते’, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भावना !

तिने साधना करून तीव्र शारीरिक, मानसिक, तसेच आध्यत्मिक त्रासांवर मात केली आहे.

‘तिची लवकर आध्यात्मिक उन्नती होवो’, ही देवाच्या चरणी प्रार्थना !’

– सौ. किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, ठाणे.

(१६.२.२०२०)


काटकसरी आणि सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ असलेल्या चि.सौ.कां. भावना श्रीराम देसाई !

१. नियोजनबद्धता

‘भावना दिवसभरातील प्रत्येक कृती ठरलेल्या नियोजनानुसार करते. ती कधी वेळ वाया घालवत नाही. ती अधिकाधिक वेळ सेवा करते. तिला एखादी सेवा सांगितल्यावर ती परिपूर्ण आणि समयमर्यादेत करण्याचा प्रयत्न करतेे.

२. काटकसरी

तिने लग्नासाठी आवश्यक तेवढीच खरेदी केली. तिचे आई-वडील तिच्यासाठी एक वस्तू घेत होते. तेव्हा ती वस्तू आवश्यक नसल्याने तिने ती वस्तू घेतली नाही.

३. प्रेमभाव

ती साधकांशी जुळवून घेते आणि सगळ्यांशी प्रेमाने वागते. त्यामुळे साधकांना तिच्याविषयी आपलेपणा वाटतो.

४. व्यष्टी आणि समष्टी साधना

४ अ. सातत्य : एकदा तिला व्यष्टी साधनेच्या आढाव्यात काही प्रयत्न करायला सांगितले होते. तेव्हा ती प्रयत्नांचा आढावा नियमितपणे द्यायची. ती चिंतन सारणीतील सर्व सूत्रे पूर्ण करते.

४ आ. मनमोकळेपणा : ती सेवेतील अडचणींविषयी उत्तरदायी साधकांशी बोलून घेते आणि त्यातून योग्य दिशा घेऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करते. सेवा करतांना तिला कुणीही काही सुधारणा सांगितली, तर ती लगेच कृतीत आणण्याचा प्रयत्न करते.

४ इ. सेवा परिपूर्ण करणे : ती सेवा पुष्कळ एकाग्रतेने करते. त्यामुळे तिने केलेल्या सेवेत कधी सुधारणा सांगाव्या लागत नाहीत. सेवा करतांना ‘अन्यत्र काय चालू आहे ?’, याकडे तिचे लक्ष नसते. ती शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांवर मात करून दिलेली सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते.

– ध्वनीचित्रीकरण सेवेशी संबंधित साधक (१.१२.२०२०)

चि.सौ.कां. भावना आणि चि. मयूर यांच्या भावी जीवनासाठी काव्यरूपी शुभेच्छा ।

दोघांनी धरावी मोक्षाची वाट ।
अंबरनाथची लाजाळू लेक भावना ।
तळमळीने करते व्यष्टी आणि समष्टी साधना ॥ १ ॥

सेवा करतेे चिकाटीने, आढाव्यात असते सातत्य ।
देवाच्या अनुसंधानात राहून सेवारत असते नित्य ॥ २ ॥

लग्नानंतर दोन जीव एकत्रितपणे करतील आयुष्याचा प्रवास ।
या प्रवासात त्यांनी नित्य घ्यावी देवाची साथ ॥ ३ ॥

देवाची संगत असली की, मिळते अडचणींतून वाट ।
|देवच नावाडी असला की, शोधावा लागत नाही नदीचा काठ ॥ ४ ॥

मयूर आणि भावना यांच्या लग्नाची गाठ ।
दोघांनी धरावी मोक्षाची वाट’ ॥ ५ ॥

– ध्वनीचित्रीकरण सेवेशी संबंधित साधक (१.१२.२०२०)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.