एच्.डी.एफ्.सी. बँकेच्या डिजिटल सेवांवर आर्.बी.आय.कडून निर्बंध

मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या एच्.डी.एफ्.सी.च्या इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि पेमेंट यूटिलिटी सेवेवर २ डिसेंबरपासून बंदी घातली आहे. तसेच बँकेच्या ग्राहकांना नवीन क्रेडिट कार्ड देण्यावरही बंदी घातली आहे. मागील दोन वर्षांत या बँकेच्या ग्राहकांना डिजिटल सेवांमध्ये अनेक वेळा अडचणी आल्या. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने हे वरील आदेश दिले आहेत. मागील दोन वर्षांत बँकेसाठी हा तिसरा मोठा धक्का आहे.


रिझर्व्ह बँकेने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून ‘बँकेकडून समाधानकारक उत्तर मिळाल्यानंतरच म्हणजे सर्व गोष्टी सुरळीत झाल्यानंतरच हे निर्बंध हटवले जातील’, असे स्पष्ट केले आहे.

‘रिझर्व्ह बँकेने सर्व डिजिटल सेवा थांबवण्याचा आदेश दिला आहे’, असे बँकेने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे. ‘बँकेने डिजिटल व्यवसायाशी संबंधित सर्व कार्यक्रमांचा प्रारंभ तात्पुरत्या स्वरूपात रोखावा, असा सल्ला रिझर्व्ह बँकेने दिला आहे.