(म्हणे) ‘जुने गोवे हा ‘वारसा विभाग’ घोषित करा !’

‘गोवा फॉरवर्ड’चे विजय सरदेसाई यांची मागणी

  • ख्रिस्त्यांचा क्रूर इतिहास जागृत करणार्‍या स्थळाला ‘वारसा विभाग’ घोषित करायचे का ?
  • विजय सरदेसाई जुने गोवे या चर्चच्या परिसराचे संरक्षण करण्याची मागणी करतात, त्याप्रमाणे गोव्यात अनेक प्राचीन मंदिरेही आहेत. त्यांच्या जतनासाठी कृती करण्याची मागणी सरदेसाई का करत नाहीत ?
आमदार विजय सरदेसाई

पणजी, ३ डिसेंबर (वार्ता.) – जुने गोवे येथे जगप्रसिद्ध बासिलिका बॉम जिझस आदी धार्मिक स्थळे आहेत. या स्थळांना ‘युनेस्को’ने वारसास्थळे म्हणून घोषित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर जुने गोवे परिसराला ‘वारसा विभाग’ म्हणून घोषित करण्याची मागणी ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. विशेष म्हणजे जुने गोवे येथील फेस्ताच्या दिवशी ही मागणी करण्यात आली आहे. जुने गोवेला ‘वारसा विभाग’ म्हणून घोषित करीपर्यंत पक्ष शांत बसणार नाही, अशी चेतावणीही आमदार विजय सरदेसाई यांनी दिली. (पोर्तुगिजांनी ख्र्रिस्ती मिशनर्‍यांच्या साहाय्याने गोव्यातील हिंदूंचे छळाबळाने धर्मांतर केले, धर्मांतर न करणार्‍यांना याच जुने गोवे परिसरात जिवंत जाळूनच नव्हे, तर अन्य अनेक जिवंतपणी मरणप्राय यातना देऊन ठार मारले. हे इन्क्विझिशन झेवियर याने पोर्तुगालच्या राजाला लिहिलेल्या पत्रावरून करण्यात आले. हे हिंदूंनी विसरू नये ! – संपादक)

आमदार विजय सरदेसाई यांनी प्रारंभी जुने गोवे ‘ग्रेटर पणजी नियोजन आणि विकास प्राधिकरण’मध्ये समाविष्ट करण्यास विरोध दर्शवला होता. या विरोधानंतर शासनाने धार्मिक स्थळांचे पावित्र्य अबाधित ठेवण्याचे कारण पुढे करून जुने गोवेला ‘ग्रेटर पणजी नियोजन आणि विकास प्राधिकरण’मधून वगळले होते.

आमदार विजय सरदेसाई पुढे म्हणाले, ‘‘जुने गोवेचे संरक्षण करण्यासाठी एक विभाग स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये वास्तूविशारद, अभियंता, नगर नियोजन करणारे तज्ञ आदींचा समावेश केला जाणार आहे. जुने गोवे हा ‘वारसा विभाग’ होण्याविषयी शासनाला पटवून देऊन त्यांच्यावर दबाव आणण्याचे काम हा गट करणार आहे. जुने गोवेचे रक्षण करण्यासाठी मी ‘युनेस्को’ आणि ‘आयकोमोस’ यांना पत्र लिहिलेले आहे, तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनाही पत्र लिहिले आहे.’’