सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या ‘आवरण परिणामकारक कसे काढावे ?’, या अभ्यासवर्गात जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
१. अभ्यासवर्गाला जाण्यापूर्वी जाणवलेली सूत्रे
‘अभ्यासवर्गाला जातांना माझ्या मनात पुष्कळ विचार होते आणि छातीत धडधड होत होती. त्यामुळे ‘आपल्याला हे जमेल का ?’, असा मला प्रश्न पडला होता.
२. अभ्यासवर्गाला गेल्यानंतर
२ अ. त्रासदायक त्रासदायक शक्तीच्या आवरणाचे परिणाम लक्षात येणे : सदगुरु राजेंद्र शिंदे यांनी पहिल्यांदा ‘स्वतःवर त्रासदायक शक्तीचे आवरण असल्यास काय परिणाम होतात ?’, असे विचारले. तेव्हा ‘सुचायचे प्रमाण अल्प होते, चक्कर येते, अनावर झोप येते, थकवा येतो, प्राणशक्ती न्यून होऊन सेवेची गती अल्प होते अन् विकल्प वाढतात अशा प्रकारचे त्रास होतात’, असे माझ्या लक्षात आले.
२ आ. आवरण काढतांना
२ आ १. आवरण काढतांना माझ्यावरील आवरण निघून शरीर आणि मन हलके झाल्याचे मला जाणवले.
२ आ २. अंगाला चिकटलेले आवरण काढतांना : त्यानंतर ‘अंगाला चिकटलेले आवरण कशा पद्धतीने काढावे ?’, हे त्यांनी आम्हाला शिकवले. तेव्हा ‘शरिरावरील त्रासदायक आवरण ओरबाडले जाऊन निघत आहे’, असे मला जाणवले.
३. मन एकाग्र करण्यास सांगितल्यावर मन संपूर्णपणे एकाग्र होणे
पुष्कळ वेळा माझे मन एकाग्र होत नाही. माझ्या मनात असंख्य विचार असतात; पण आज या अभ्यासवर्गात जितका वेळ सत्र चालू होते, तोपर्यंत ‘माझे मन एकाग्र झालेे होते’, याची मी अनभूती घेत होते. माझ्या शरिराची मुळीच हालचाल झाली नाही, तसेच सत्राच्या वेळी मिटलेले डोळे सत्र पूर्ण झाल्यावरच उघडले. हे मी पहिल्यांदाच अनुभवत होते.
४. श्री दुर्गादेवीचा भावप्रयोग करणे
त्यानंतर सदगुरु राजेंद्रदादांनी मन एकाग्र करायला सांगून श्रीदुर्गादेवीला प्रार्थना करण्यास सांगितले. तेव्हा ‘श्री दुर्गादेवी मला आशीर्वाद देत आहे’, असे मला जाणवले. या प्रयोगाच्या वेळी सूक्ष्मातून श्री दुर्गादेवीने तिच्या हातातील तलवार मला दिली आणि लढण्यास सांगितले; परंतु मला ती तलवार घेऊन लढता येत नव्हते. तेव्हा मला माझ्यामध्ये लढाऊवृत्ती अल्प असल्याची जाणीव झाली.
५. मारुतिरायाने मानस दृष्ट काढणे
मारुतिराया मानस दृष्ट काढत असतांना ‘सूक्ष्मातून प्रत्यक्ष मारुतिराया माझ्या समोर उभा आहे आणि तो माझी दृष्ट काढत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी सदगुरु राजेंद्रदादा सांगत असलेली प्रत्येक कृती तशीच्या तशी प्रत्यक्ष होतांना दिसत होती.
सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी आम्हाला ‘स्वतःवर आवरण किती प्रमाणात आहे ?’, हे शोधण्याची पद्धत शिकवली. तसे केल्यावर ‘आपल्यावर किती आवरण असते ?’, ते समजले. त्या वेळी माझी प्रत्येक कृती भावपूर्ण होत होती. परात्पर गुरुदेव आपल्या कृपेमुळेच हे सर्व शिकता आले. याविषयी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. संगीता लोटलीकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.३.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |