पणजी, २ डिसेंबर (वार्ता.) – ‘ग्रेटर पणजी नियोजन आणि विकास प्राधिकरण’च्या अंतर्गत जुने गोवे पंचायत क्षेत्रातील आणखी काही भाग ‘ग्रेटर पणजी नियोजन आणि विकास प्राधीकरण’च्या अंतर्गत आणण्याचा प्रस्ताव नगरनियोजन विभागाने रहित केला आहे. ख्रिस्ती संस्थांच्या विरोधामुळे शासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती नगरनियोजनमंत्री तथा उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी दिली आहे. (हिंदूंनीही महामार्ग रुंदीकरण किंवा विकास यांसाठी मंदिरे तोडण्यास किंवा स्थलांतरित करण्यात येत असतील, तर त्याला ख्रिस्त्यांप्रमाणेच संघटितपणे विरोध करणे अपेक्षित आहे. – संपादक)
उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर पुढे म्हणाले, ‘‘ग्रेटर पणजी नियोजन आणि विकास प्राधिकरण’च्या अंतर्गत पंचायत क्षेत्राचा काही भाग समाविष्ट करण्याचा प्रस्ताव जुने गोवे पंचायतीने दिला आहे. या प्रस्तावाचा नगरनियोजन विभागाने अभ्यास केला आहे. ख्रिस्ती धार्मिक संस्थांनी व्यक्त केलेल्या भावनांचाही आम्ही विचार केला आहे. याविषयी मी मुख्यमंत्र्यासमवेत चर्चा केली. ख्रिस्त्यांच्या धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने कदंब नियोजन क्षेत्राच्या विस्ताराच्या प्रस्तावाला गाळणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. राजकीय पक्षांनी विरोध केल्याने शासनाने निर्णय घेतलेला नाही.’’