फोंडा, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘कीर्तनातून आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन होते’, असे उद्गार माजी मंत्री आणि शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी गोमंतक संत मंडळ संचालित कीर्तन विद्यालय फोंडा आणि शांताप्रसाद अद्वैतानंद न्यास शिरोडा यांच्या वतीने आयोजित ‘बाल कीर्तनकार चक्रीकीर्तने’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी काढले. उद्घाटन सोहळ्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी व्यासपिठावर डॉ. शिरीष बोरकर, समाजसेवक जयंत मिरिंगकर, कीर्तन विद्यालयाचे प्राचार्य सुहास वझे उपस्थित होते.
याप्रसंगी सुभाष शिरोडकर म्हणाले, ‘‘कीर्तनामुळे संस्कार मिळतात. भगवद्गीता, स्तोत्रे मुखात येतात. यामुळे समाजात एकता निर्माण होते; म्हणून आज तरुण मुलामुलींनी कीर्तनाचे प्रशिक्षण घ्यावे. ही काळाची आवश्यकता आहे.’’ अशा कीर्तन संस्कार प्रबोधन कार्यासाठी मुलांना व्यासपीठ मिळवून द्यायला आमचे नेहमीच सहकार्य असेल, असे डॉ. शिरीष बोरकर आणि श्री. जयंत मिरिंगकर यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक भाषणामध्ये ह.भ.प. सुहासबुवा वझे यांनी ‘आपण कोणताही भेदभाव न करता सर्व समाजातून कीर्तनकार घडवण्याचे कार्य करत रहाणार’, असे सांगितले.
या चक्रीकीर्तन कार्यक्रमात ह.भ.प. उर्वी देसाई, भक्ती वळवर्ईकर, सर्वेश साळगावकर, शारदा आरोंदेकर, विष्णु गवस, मैत्रेयी आमशेकर यांनी पहिल्यांदाच कीर्तने सादर केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अद्वैत मिरिंगकर, विश्वनाथ जोशी, देवानंद सुर्लकर, प्रियंवदा मिरिंगकर, विनोद नाईक, गजेश नाईक, पांडू काजरेकर, विराज शेणवी यांनी सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दीपा मिरिंगकर यांनी केले आणि दामोदर कामत यांनी आभार मानले.